धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडील थकीत ऊसबिल व वाढीव दोनशे रुपये हप्ता द्यावा अन्यथा एकाही कारखान्याचे धुराडे पेटू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने साखर आयुक्तांना देण्यात आला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गुरुवारी (दि.14) जिल्हाधिकाऱ्यांमार्फत साखर आयुक्तांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील ज्या साखर कारखान्यांना धाराशिव जिल्ह्यातून ऊस जातो, त्या सर्व कारखान्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निवेदन देण्यात आले आहे.  येत्या गळीत हंगामापूर्वी थकीत बिले तसेच वाढीव दोनशे रुपये हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावा, अन्यथा एकही साखर कारखान्याचे धुराडे पेटू देणार नाही. गळीत हंगाम तोंडावर आलेला असताना अनेक साखर कारखान्यांनी गेल्यावर्षीच्या ऊसाचे बिल दिलेले नाही. ते लवकरात लवकर जमा करावे यासाठी साखर आयुक्तांनी लक्ष देऊन मागणी मान्य करावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे, जिल्हा उपाध्यक्ष धनाजी पेंदे, धर्मराज पाटील, धनाजी पाटील यांची स्वाक्षरी आहे.



 
Top