नळदुर्ग (प्रतिनिधी)-अवर्षण स्थितीमुळे तुळजापूर तालुक्यातील जळकोट, नळदुर्ग मंडळ तसेच इतर वंचित गावांना पीकविमा अग्रीम यादीमध्ये समाविष्ट करावे यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनच्या वतीने रविवारी (दि.10) हैद्राबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर नळदुर्ग येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

गेल्या दीड महिन्यापासून संपूर्ण जिल्ह्यात पावसाचा खंड असताना इतर मंडळांमध्ये कमी पाऊस आणि नळदुर्ग, जळकोट, शहापूर परिसरात चांगला पाऊस झाल्याचे दाखवून जवळपास 50 गावातील शेतकऱ्यांवर प्रशासनाने अन्याय केला आहे. मुळातच प्रशासनाने पर्जन्यमापके चुकीच्या ठिकाणी बसवली आहेत. शिवाय अपेक्षित पाऊस नसताना शेतकऱ्यांची पिके अक्षरशः होरपळून गेलेली असताना प्रशासनाने मात्र येथे चांगला पाऊस झालेला दाखवून अनुदानातून ही गावे वगळलेली आहेत. त्यामुळे संबंधित जळकोट, नळदुर्ग, शहापूर मंडळातील जवळपास 50 गावे ही अग्रीम अनुदानामध्ये समाविष्ट करून घ्यावी अन्यथा नळदुर्ग बस स्थानकासमोर हैद्राबाद-सोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला होता. तरीदेखील प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे रविवारी नळदुर्ग बस स्थानकासमोर हे आंदोलन करण्यात आले. प्रशासनाने या भागातील शेतकऱ्यांना पीकविमा अग्रीम मंजूर करण्यासाठी पुढील कार्यवाही न केल्यास आणखी तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांनी यावेळी दिला.

या आंदोलनात जिल्हा संपर्कप्रमुख शहाजी सोमवंशी, जिल्हा उपाध्यक्ष धनाजी पेंदे, भास्कर सुरवसे, नानासाहेब पाटील, बाबू जाधव, युवराज नवाडे, नागनाथ व्हंताळे, गजेंद्र कांबळे, मधुकर लवटे, विक्रम भोंडवे, भीमा काळे, परमेश्वर व्हंताळे, नेताजी काळे, मधुकर जाधव, दिनकर जगताप, प्रमोद काळे, गणेश जाधव यांच्यासह जळकोट, नळदुर्ग, शहापूर परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


 
Top