धाराशिव (प्रतिनिधी)-तांत्रिक वस्त्रनिर्मिती उद्योगाशी संबंधित आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य प्रदर्शन दिनांक 12 ते 14 सप्टेंबर दरम्यान मुंबई येथे आयोजित असून पहिल्यांदाच एमआयडीसी यामध्ये सहभागी होत ‘कौडगाव टेक्निकल टेक्सटाईल्स पार्क' चे दालन लावणार आहे.
मुंबई येथे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मधील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर मध्ये 'टेकटेक्स्टिल' नावाने प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून यामध्ये जर्मनी, चीन व तैवानसह जगभरातील 160 हून अधिक कंपन्यांचा सहभाग आहे. या प्रदर्शनामध्ये तांत्रिक कापड निर्मितीसाठी आवश्यक मशीनरी, इक्विपमेंट्स, ॲक्सेसरीज निर्माते, विक्रेते व पुरवठादार सहभागी होणार आहेत. देश विदेशातील तांत्रिक वस्त्रोद्योग क्षेत्रातील व्यापार आणि गुंतवणुकीच्या क्षमता याठिकाणी निदर्शनास येणार आहेत.
भारतातील तांत्रिक वस्त्रनिर्मिती उद्योग हा जगातील पाचवा सर्वात मोठा उद्योग असून जवळपास 2000 कोटींची वार्षिक उलाढाल असणारा हा उद्योग आगामी पाच वर्षात 4000 कोटीं पर्यंत नेण्याचे उदिष्ट आहे. तांत्रिक वस्त्र उत्पादनांची विविध उपयोजन क्षेत्रात असलेली मोठी मागणी आणि सध्याच्या जागतिक बाजारपेठेतील गतिशीलता यातून या उदयोन्मुख उद्योगाची भविष्यातील मोठी कामगिरी सूचित होते. या उद्योगात रोजगार निर्मितीला मोठा वाव आहे.
धाराशिवला एमआयडीसीच्या माध्यमातून देशातील पहिला तांत्रिक वस्त्र निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रदर्शनामध्ये एमआयडीसीला आवर्जून सहभागी होण्याचे सुचित केले होते. आ. राणाजगजितसिंह पाटील हे या विषयात वैयक्तिक लक्ष घालत असून प्रदर्शनीला भेट देत उद्योजक व व्यावसायिकांशी चर्चा करणार आहेत. या माध्यमातून तांत्रिक वस्त्रनिर्मिती उद्योग धाराशिव येथील कौडगाव एमआयडीसीमध्ये आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.