धाराशिव (प्रतिनिधी)- मागील तीन दिवसापासून सुरक्षिततेच्या कारणावरून बस सेवा स्थगित करण्यात आल्याने ग्रामीण भागातील नागरिकांनी शहरात येण्याचे टाळले आहे. त्याचाच परिणाम म्हणून उस्मानाबाद येथील बाजारपेठ देखील थंडावली आहे. या तीन दिवसात एकूण 6 हजार 300 फेऱ्या रद्द झाल्या असून, एसटी महामंडळास दीड कोटी रूपयाचे नुकसान झाले आहे.
पूर्णतः ग्रामीण भागावर अवलंबून असलेली धाराशिव येथील बाजारपेठ मागील चार दिवसापासून ग्राहक नसल्याने थंडावली आहे. एकीकडे खाजगी वाहतूकदार अव्वाच्या सव्वा भाडे आकारत आहेत. त्याचाही परिणाम नागरिकांच्या येण्या जाण्यावर झाला आहे. बहुतांश ग्रामीण भागातील नागरिक, ज्येष्ठ नागरिक बसने प्रवास करतात आणि हेच बाजारपेठेचे ग्राहक आहेत. आज आठवड्याचा पहिला दिवस असून देखील व्यापारपेठेत नागरिकांची तुरळक प्रमाणात उपस्थिती आहे. एकंदरीत प्रवाश्यांसोबत व्यापारी देखील बस सेवा लवकर सुरू व्हावी असा धावा करत आहेत.
बस सेवा दुपारपासून सुरू
एसटी महामंडळाचे विभागीय वाहतूक अधिकारी हर्षद बनसोडे यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, गेल्या तीन दिवसापासून एसटी बस बंद असल्याने महामंडळाला जिल्ह्यात दीड कोटीचे नुकसान झाले आहे. सोमवार दि. 4 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे तलाठी पदासाठी परिक्षा असल्याने तुळजापूरहून 2 व धाराशिव येथून 1 अशा तीन बसेस पाठविल्या आहेत. सोमवारी दुपारपासून पुर्व दक्षता घेत जिल्ह्यात एसटी सुरू करतो आहोत. सोलापूर, लातूर, पूणे, हैदराबाद या लांब पल्याच्या बसेस सुरू करणार असल्याची माहिती एसटी महामंडळाचे विभागीय वाहतूक अधिकारी हर्षद बनसोडे यांनी सांगितले आहे.