धाराशिव (प्रतिनिधी)-देशात व राज्यात सर्वत्र समाज सुधारकांचे पुतळे पहायला मिळतात. याच संकल्पनेतून धाराशिव येथील श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये आदर्श निर्माण करणारे आदर्श शिक्षण संस्थेचे संस्थापक के. टी. पाटील यांचा पुतळा उभा करण्यात आला आहे. विकसनशील भारत घडविण्यासाठी व देशाच्या प्रगतीसाठी अशा संस्थेकडूनच प्रेरणा मिळते असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केले.

सोमवार दि. 11 सप्टेंबर रोजी भोसले हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी भोसले हायस्कूलचे मुख्याध्यापक व संस्थापक यांचा ब्राझचा 9 फुटी पुतळा उभा करण्यात आला. पुतळा अनावरण प्रसंगी नार्वेकर बोलत होते. यावेळी आमदार श्रीकांत भारतीय, आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार ज्ञानराज चौगुले, आमदार अभिमन्यू पवार, माजी खासदार प्रा. रविंद्र गायकवाड, ॲड. मिलिंद पाटील, नितीन काळे, नेताजी पाटील, संताजी चालुक्य, गाडे सर, उद्योगपती संजय बारगजे, डॉ. सुहास बावीकर, अर्जुनवीर पुरस्कार प्राप्त पैलवान काकासाहेब पवार यांच्यासह मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाईन कार्यक्रमास शुभेच्छा देवून नागपूर येथील खंडपीठात महत्वाचा कार्यक्रम असल्यामुळे आपण येवू शकलो नाही. के. टी. पाटील सरांनी गावागावात शिक्षणाची बीजे रोवले. त्याच बीजाचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे असे सांगून शुभेच्छा दिल्या.

पुढे बोलताना नार्वेकर म्हणाले की, सांगली सारख्या सधन भागातून दुष्काळाग्रस्त भागात येवून ज्ञानगंगा प्रवाहीत केली. राज्यात मातृभाषेत शिक्षण देणारी सर्वात मोठी संस्था म्हणून संस्था नावाजलेली आहे. संस्थेने समाजाला अनेक अभियंते, डॉक्टर, तज्ञ लोक दिले आहेत. त्यामुळे गुणवत्ताधारक व सुशिक्षित समाज घडविण्यामध्ये अशा संस्थेचा मोठ्या प्रमाणात वाटा आहे असेही नार्वेकर यांनी सांगितले. 

यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी जिल्ह्यात अपुऱ्या पावसामुळे दुष्काळाचे सावट असून, 12 टक्के पाणीसाठा आहे. शेतकरी अडचणीत आहेत. 25 टक्के अग्रीम रक्कम देण्यासाठी प्रयत्न करावा. जिल्ह्याच्या विकासात या शाळेतून शिकून गेल्या माजी विद्यार्थ्यांनी योगदान द्यावे असे आवाहन केले. आपल्या प्रास्ताविक भाषणात सुधीर पाटील यांनी या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी के. टी. पाटील सरांनी आम्हाला घडवले आहे. त्यामुळे पुतळा उभारणीचा कार्यक्रम वैयक्तिक न करता सार्वजनिक करा अशी मागणी केल्यामुळे हा कार्यक्रम घेत असल्याचे सांगून या पुढे चॅरिटेबल हॉस्पिटल, युपीएसी साठी भव्य लॉयब्ररी असे उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थित पाहुण्यांचे संस्थेच्यावतीने सुधीर पाटील व आदित्य पाटील यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दौलत निपाणीकर, आर. बी. जाधव, संदीप जगताप, राम मुंडे यांनी केले.


 
Top