धाराशिव (प्रतिनिधी)-गोसावी समाजाच्या दफनभूमीकरिता धाराशिव शहरात जागा उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी दशनाम गोसावी चॅरिटेबल ट्रस्ट व गोसावी समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

निवेदनात म्हटले आहे की, धाराशिव शहरामध्ये गोसावी समाजाच्या दफनभूमीसाठी अद्याप जागा उपलब्ध करुन देण्यात आलेली नाही. सदरील मागणीसाठी यापूर्वी जिल्हाधिकारी, नगर परिषदेचे तत्कालीन नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांना वेळोवेळी निवेदने दिली. त्यानंतर नगर परिषदेच्या 23 एप्रिल 2021 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत याबाबत ठरावही घेण्यात आला. परंतु पुढे कारवाई झालेली नाही. दफनविधीसाठी जागा उपलब्ध नसल्याने समाजातील व्यक्तीचे निधन झाल्यानंतर मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागते. म्हणून समाजाच्या दफनभूमीसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी दशनाम गोसावी समाज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आली आहे. बहुजन योद्धा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय शिंगाडे यांनी या मागणीला पाठींबा दर्शवून तात्काळ जमीन उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

निवेदनावर ट्रस्टचे अध्यक्ष अभिजित गिरी, सचिव सुनील गोसावी, कैलास पुरी, सोमनाथ गिरी, दत्ता गिरी, सुनील गिरी, कानिफनाथ गिरी, पोपट पुरी, जगन्नाथ पुरी, मोहन गोसावी, विलास गिरी, ॲड. भीमाशंकर बन, राजाभाऊ गिरी, अंकुश पुरी गोसावी, संजय गिरी, विलास गिरी व इतर समाजबांधवांची स्वाक्षरी आहे.


 
Top