धाराशिव (प्रतिनिधी)-बहुजनांचे नेते छगनराव भुजबळ यांचे हात मजबूत करण्यासाठी अखिल भारतीय समता परिषदेचे संघटन मजबूत करावे. त्यासाठी समता सैनिकांनी गाव तेथे शाखा स्थापन करून जास्तीत जास्त लोकांना जोडण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुभाष राऊत यांनी केले.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या धाराशिव जिल्हा कार्यकारिणीची आढावा बैठक मंगळवारी (दि.5) शहरातील मेघमल्हार हॉटेलच्या सभागृहात पार पडली. यावेळी ते बोलत होते. बैठकीस अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राज्य प्रचारक प्रा.डॉ.नागेश गवळी, पश्चिम मराठवाडा विभागीय अध्यक्ष आबासाहेब खोत, संतोष भाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना राऊत म्हणाले की, मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करून ओबीसी समाजाला आरक्षण मिळवून देण्याचे काम छगनराव भुजबळ यांनी केले. ओबीसी महामंडळाची स्थापना, ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यृवत्ती अशी कामे मोठ्या ताकदीने त्यांनी केली. राजकीय महत्त्वाकांक्षा बाजुला सारून भुजबळ यांनी बहुजन समाजाचा विचार कायम राखल्याचेही ते म्हणाले.
यावेळी प्रदेश प्रचारक प्रा.डॉ.गवळी यांनीही विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पश्चिम मराठवाडा विभागीय अध्यक्ष आबासाहेब खोत यांनी केले. सूत्रसंचालन राहुल बनसोडे यांनी तर आभारप्रदर्शन रॉबिन बगाडे यांनी केले. बैठकीस बिभीषण खुणे, संतोष डोरले, प्रशांत वेदपाठक, संतोष भाकरे, प्रदीप राऊत, महादेव लोकरे, आशिष माने, अजय देवकुळे, भजनदास जगताप, रणजित डोंगरे, हनुमंत पंडित यांच्यासह इतर पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.