धाराशिव (प्रतिनिधी)-गौरी-गणपती सणानिमित्त समुद्रवाणी, ता.धाराशिव येथे 'आनंदाचा शिधा' वाटपास सुरुवात केली. सर्वत्र गौरी गणपतीचे आगमन झाले आहे. त्यामुळे सर्वत्र नवचैतन्य, उत्साह दिसून येत आहे. या उत्सवात गरिबांना देखील सहभागी होता यावे यासाठी जिल्ह्यातील रेशन कार्डधारकांना 'आनंदाच्या शिधाचे' वाटप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत राज्यातील लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच दारिद्य्र रेषेवरील (एपीएल) केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना प्रत्येकी 1 किलो या प्रमाणात रवा, चनाडाळ, साखर व 1 लीटर खाद्यतेल हे शिधा जिन्नस समाविष्ट असलेले शिधा जिन्नस संच 'आनंदाचा शिधा' गौरी-गणपती उत्सवानिमित्त वितरीत करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. सदर आनंदाचा शिधा दि. 1 ते 30 सप्टेंबर या कालावधीत सवलतीच्या दराने वितरीत करण्यात येईल.