धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव लोकसभा निवडणुकीसाठी मी व माजी आमदार सुजितसिंह ठाकूर इच्छुक आहे अशी प्रकाराची घोषणा भाजपाचे जेष्ठ नेते ॲड. मिलिंद पाटील यांनी परंडा येथील कार्यक्रमात वर्षभरापूर्वीच केली होती.
सध्या जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेले भाजपाचे बसवराज मंगरुळे ठिकठिकाणी बॅनर बाजी करीत आहेत. मंगरुळे हे मुळचे मुरूम येथील असले तरी ते गुत्तेदारीमुळे छत्रपती संभाजीनगर येथे स्थायीक आहेत. जिल्ह्याच्या राजकारणात सक्रीय असलेले महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. मिलिंद पाटील व भाजपचे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांचे नाव सध्या भाजप पक्षपातळीवर अग्रेसर असल्याचे समजले. ॲड. मिलिंद पाटील महाराष्ट्र गोवा बार असोसिएशनचे अध्यक्ष झाल्यानंतर परंडा येथे सुभाषसिंह सिध्दीवाल यांनी सत्कार कार्यक्रम ठेवला होता. याच कार्यक्रमात ॲड. मिलिंद पाटील यांनी आगामी धाराशिव लोकसभा निवडणुकीसाठी आपण व माजी आमदार सुजितसिंह ठाकूर इच्छुक असल्याचे सांगितले. ॲड. पाटील यांनी पक्षपातळीवर आम्ही दोघेही प्रयत्न करणार असल्याचे सांगितले होते.
जिल्ह्यात भाजपच्या राष्ट्रीय व राज्यपातळीवर सुजितसिंह ठाकूर, ॲड. मिलिंद पाटील व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे वजन आहे. त्यामुळे लोकसभेची उमेदवारी ठाकूर का मिलिंद पाटील हेच ठरणार असल्याचे समजते. विशेष म्हणजे जिल्ह्याच्या विकासाची तळमळ यांच्याकडे दिसून असल्याने व सामान्य कार्यकर्त्यांशी नाळ जुळल्याने कार्यकर्त्यांतून लोकसभा उमेदवारांसाठी ठाकूर व ॲड. पाटील यांचे नावे अग्रेसर असल्याचे समजते.