धाराशिव (प्रतिनिधी)- भाजपाचे नेते विजय दंडनाईक हे संस्थापक चेअरमन असलेल्या वसंतदादा नागरी सहकारी बँके प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची घटना ताजी असतानाच, त्यांचे सुपूत्र रोहितराज विजयकुमार दंडनाईक हे चेअरमन असलेल्या धाराशिव शहरातील अरविंद नागरी सहकारी पतसंस्थतेही कोट्यवधी रूपयांचा आर्थिक घोटाळा झाला आहे. ठेवीवर जादा व्याज (14 टक्के) देण्याचे आमिष दाखवून ठेवीदारांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी पतसंस्थेचे चेअरमन रोहितराज दंडनाईक, व्हाईस चेअरमन, तत्कालिन संचालक मंडळ, तत्कालिन पदाधिकारी यांच्यावर आनंदनगर पोलीस ठाण्यात शुक्रवारी दि. 1 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, अरविंद नागरी सहकारी पतसंस्थेच्या लेखापरिक्षण अहवालात गंभीर बाबी व दोष दिसून आल्याने सहकार विभागाने कलम 88 नुसार या पतसंस्थेची चौकशी प्रस्तावित केली आहे. सहाय्यक निबंधक डॉ. अंबिलपुरे यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. वसंतदादा नागरी बँकेच्या चेअरमन, व्यवस्थापक, संचालक मंडळावर गुन्हे दाखल झाल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यातील ठेवीदारांमध्ये खळबळ उडालेली असतानाच, आता विजय दंडनाईक यांचे सुपूत्र रोहितराज दंडनाईक हे चेअरमन असलेल्या धाराशिव येथील अरविंद नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनसह संचालक मंडळावर गुन्हे दाखल झाल्याने खळबळ माजली आहे.


 
Top