धाराशिव  (प्रतिनिधी)- दिव्यांगांना विविध शासकीय योजनेचा लाभ देण्यासाठी तसेच आवश्यक दाखले काढण्यासाठी राज्य शासनाकडून दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी  हे अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियान गुरुवार 21 सप्टेंबर 2023 रोजी छायादीप मंगल कार्यालय, औरंगाबाद रोड, उस्मानाबाद येथे पार पडणार आहे. या अभियानात जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील दिव्यांग व्यक्तींनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे. तसेच वेगवेगळ्या विभागांनी आपापल्या जबाबदाऱ्या अचूकपणे पार पाडाव्यात अशा सूचनाही  त्यांनी यावेळी दिल्या.

या अभियानात आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री डॉ. तानाजीराव सावंत व दिव्यांग मंत्रालय दिव्यांगाच्या दारी अभियानाचे अध्यक्ष ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू हे मार्गदर्शन करणार आहेत.

या अभियानात दिव्यांग लाभार्थींची  प्रवर्गनिहाय ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करण्यात येणार आहे. आशासेविका व अंगणवाडी सेविका यांच्याकडून प्राप्त झालेले दिव्यांग लाभार्थीचे अर्ज तसेच यापूर्वी प्रलंबित असलेले अर्ज यावर उचित कार्यवाही करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याचा लाभ दिव्यांग लाभार्थ्यांनी घ्यावा, असेही आवाहन श्री. गुप्ता यांनी केले आहे

या आढावा बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सूर्यकांत भुजबळ,  शिक्षणाधिकारी सुधा साळुंखे, नगरपालिकेच्या मुख्याधिकारी  वसुधा फड, विविध भागाचे अधिकारी तसेच दिव्यांग क्षेत्रात काम करणारे विविध संस्थांचे संघटना यांचे प्रतिनिधी यावेळी हजर होते.


 
Top