धाराशिव (प्रतिनिधी)- येथील तुळजाभवानी क्रिडा मैदानावर 1 नोव्हेंबर 2023 ते 5 नोव्हेंबर 2023 पर्यंत गादी व मातीवरील कुस्ती स्पर्धा होणार आहेत. विजेत्या महाराष्ट्र केसरी पैलवानास 30 लाख रूपये रोख व चांदीचा मानाचा गदा तर उपविजेत्यास महिंद्रा ट्रॅक्टर भेट देणार आहे. या कुस्ती स्पर्धेसाठी एकूण 2 कोटी रूपयांचे बक्षीसे देणार असल्याची माहिती संयोजक सुधीर पाटील व महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे कार्यालयीन सचिव ललित लांडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

रविवार दि. 3 सप्टेंबर रोजी झालेल्या या पत्रकार परिषदेस महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष दयानंद भक्त, विजय बराटे, अर्जुनवीर पुरस्कार काकासाहेब पवार, विभागीय सचिव भरत मेकाले, तांत्रिक सचिव बंकट यादव, धाराशिव तालीम संघाचे जिल्हा सचिव वामनराव गाते, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, माजी नगराध्यक्ष अमित शिंदे, अभिराम पाटील आदी उपस्थित होते. धाराशिव येथे होणाऱ्या या 65 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पाच दिवस चालणार आहेत. राष्ट्रीय स्तरावरील हिंद केसरी हरिश्चंद्र बिराजदार यांची कर्मभूमी असल्यामुळे या र्स्प्धा धाराशिव येथे होत आहेत. यामध्ये 45 जिल्ह्यातून संघ सहभागी होणार असून, मातीतील कुस्तीसाठी 450 तर गादीवरील कुस्तीसाठी 450 पैलवान असे एकूण 900 पैलवान या स्पर्धेत भाग घेणार आहेत. 10 वेगवेगळ्या वजन गटात या स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेसाठी उत्तेजनार्थ 12 लाख रूपयांचे बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. 

या स्पर्धा आयोजन करण्याचा मान धाराशिवला प्रथमच मिळाला असून, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ व धाराशिव कुस्ती तालीम संघाने यांचे आयोजन केले आहे. दुष्काळी जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या धाराशिवने स्पर्धेसाठी आता पर्यंतचे सर्वात जास्त बक्षीसे ठेवली आहेत. यावेळी संतोष नलावडे, पैलवान मारूती आप्पा वडार, अक्षय ढोबळे, राजसिंह राजेनिंबाळर आदी उपस्थित होते.


 
Top