धाराशिव (प्रतिनिधी)- अंबेजवळगा येथील माळवस्तीवर महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित केलेला गुटखा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुटखा एकूण 5, 36,000 रूपया मुद्देमाल जप्त केला असून, अवैध गुटखा विक्री करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, दि. 2 सप्टेंबर 2023 रोजी 22.10 स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी यशवंत जाधव यांना अंबेजवळगा येथील माळवस्ती मध्ये तीन इसम महाराष्ट्र शासन प्रतिबंधीत अन्न पदार्थ सुगंधीत सुपारी व गोवा गुटख्याच्या पुड्या अवैध विक्री करत आहे, अशी गोपनिय बातमी मिळाली त्या बातमीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने लागलीच सदर ठिकाणी जाउन छापा कारवाई केली. तसेच पथकाने आबासाहेब नन्वरे यांचे शेतात पत्र्याचे शेडमध्ये जावून पाहणी केली असता त्यामध्ये एकुण पोते क्र 1 ते 31 मध्ये हिरा पान मसालाचे पाऊच मिळून आले. प्रत्येक पोत्यामध्ये 100 पाऊच, असे एकुण 3100 पाऊच, पोते क्र 32 ते 37 मध्ये पाहणी करता आतमध्ये गुटख्याचे 420 पाऊच सह एक होन्डां शाईन मोटरसायकल असा एकुण 5,36,000 रूपये किंमतीचा सुगंधीत पान मसाला, गुटखा साठवण करुन सदरचा गुटखा विक्री करण्यासाठी पत्रयाचे शेड मध्ये ठेवलेला मिळून आला. त्याचा सविस्तर पंचनामा करुन माल जप्त करुन ताब्यात घेउन गुटखा विक्री करणारे आबासाहेब ननवरे, विशाल हनुमंत पवार, किरण उर्फ कृष्णा जाधव रा. अंबेजवळगा, ता. जि. धाराशिव याचेविरुध्द दि.03.09.2023 रोजी धाराशिव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कामगीरी ही पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक नवनित कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी यशवंत जाधव, सपोनि मनोज निलंगेकर, पोलीस हावलदार हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, बबन जाधवर, बलदेव ठाकुर, चालक पोलीस हावलदार मस्के यांच्या पथकाने केली.