धाराशिव (प्रतिनिधी)-महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवी मंदिराच्या विकासाठी तब्बल एक हजार 385 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यातून मंदिरातील एकूण 28 कामे हाती घेण्यात येणार आहेत. याव्यतिरिक्त जिल्ह्यातील तुळजापूर, नळदुर्ग आणि उमरगा येथील रस्ते विकासासाठी 367 कोटी रुपयांना मंजुरी देण्यात आली आहे. तेर, जागजी, माणकेश्वर तिर्थक्षेत्रासाठी 46 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शनिवारी धाराशिव जिल्ह्याच्या पदरात भरभरून निधी दिला आहे अशी माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

जाहीर केलेल्या निधीमध्ये नवीन महाद्वार, मंदिरातील सभामंडप, रामदरा तलावाजवळ 105 फूट उंचीचे तुळजाभवानी देवीचे शिल्प, लाईट आणि साउंड शो, वाहनतळ आशा महत्वाच्या कामांचा यात समावेश करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त तुळजापूर, नळदुर्ग आणि उमरगा तालुक्यातील रस्त्यांसाठी 367 कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे. तेर येथील संतश्रेष्ठ गोरोबा कुंभार यांचे मंदिर व अन्य पुरातन स्थळांच्या विकासासाठी 20 कोटी रुपये, माणकेश्वर येथील हेमाडपंथी मंदिराच्या विकासासाठी 11 कोटी आणि जागजी येथील महालक्ष्मी मंदिरासाठी 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. तुळजापूर तालुक्यात शेळी समूह योजना राबविण्यासाठी 10 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले. यावेळी याच बैठकीत रखडलेल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेचा निर्णय झाला असून,लातूर-बार्शी-टेंभुर्णी या महामार्गाच्या चौपदरीकरणासही बैठकीत मंजुरी देण्यात आली असल्याचे सांगितले आहे.

 

 
Top