धाराशिव (प्रतिनिधी) - आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव गुरुवर्य स्व. के.टी. पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते 11 सप्टेंबर रोजी होणार असल्याची माहिती पुतळा अनावरण समितीचे स्वागताध्यक्ष आ. श्रीकांत भारतीय यांनी भोसले हायस्कूल येथील पत्रकार परिषदेत दि.7 सप्टेंबर रोजी दिली.

धाराशिव शहरातील श्रीपतराव भोसले हायस्कूलच्या प्रशासकीय भवन मध्ये आयोजित करण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेत आ. भारतीय बोलत होते. यावेळी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीरअण्णा पाटील, के.टी  पाटील स्मारक समितीचे फुलचंद गाडे आदी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना आ. भारतीय म्हणाले की,  महाराष्ट्रातील अनेक शिक्षण तपस्वींनी शिक्षणाची गंगा ग्रामीण भागात पोहोचवली. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सामाजिक व शैक्षणिक विकास झाला असल्याचे त्यांनी सांगितले. स्व.के.टी. पाटील यांनी सांगली येथून धाराशिव येथे येऊन येथील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळावी यासाठी शिक्षण क्षेत्राला वाहून घेतले व अनेक विद्यार्थी घडविले आहेत. त्यांनी धाराशिव शहरात शिक्षणाची गंगा आणून येथील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची दारे खुले करून दिली असल्याचे त्यांनी सांगितले.

या स्मारकासाठी विविध 27 समित्या तयार करण्यात आल्या असून यामध्ये 1700 लोक काम करीत आहेत. या कार्यक्रमासाठी पालकमंत्री तानाजी सावंत, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, खा ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ. प्रवीण दरेकर, आ राणाजगजितसिंह पाटील, आ. कैलास पाटील, आ. ज्ञानराज चौगुले, आ. संभाजी पाटील निलंगेकर, आ. सुभाष देशमुख, आ. सुरेश धस, आ रमेशअप्पा कराड, आ. संजय केणेकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रमोद येवले, भारती विद्यापीठाचे कुलपती शिवाजीराव कदम, जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, शिक्षणाधिकारी सुधा साळुंखे आदी उपस्थित राहणार आहेत. तसेच या शाळेमध्ये शिक्षण घेतलेल्या 1 लाख 20 हजार विद्यार्थ्यापैकी 42 हजार विद्यार्थ्यांना निमंत्रण दिले असून त्यापैकी 27 हजार 72 माजी विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर यामध्ये डॉक्टर, न्यायाधीश, अभियंता, विविध क्षेत्रात अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. या कार्यक्रमासाठी भोसले हायस्कूलच्या मैदानावर 22 हजार नागरिक बसतील असा वॉटरप्रूफ मंडप उभा केला असून कुठलीही गैरसोय होणार नाही याची दक्षता समिती घेत असल्याचे भारतीय यांनी सांगितले. 

 

 
Top