धाराशिव (प्रतिनिधी)- राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंतीनिमित्त देशभर 16 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत स्वच्छता पंधरवडा आणि स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत वेगवेगळे कार्यक्रम राबविण्यात येत आहेत, या अनुषंगाने माननीय पंतप्रधान यांनी आपल्या ‌‘मन की बात' कार्यक्रमांमध्ये एक ऑक्टोबर रोजी देशातील विविध ऐतिहासिक स्थळे, नदी आणि अमृत सरोवर या ठिकाणी एक तास श्रमदानाच्या माध्यमातून स्वच्छता करण्याचे आवाहन केले आहे या आव्हानाला अनुसरूनच भारत सरकार माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, सोलापूर यांच्या वतीने नळदुर्ग किल्ल्यामध्ये एक तास स्वच्छता करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार 1 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 10 ते 11 या वेळेत नळदुर्ग किल्ला परिसरातील उपली बुरुजाची स्वच्छता करण्यात येणार असल्याची माहिती क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण यांनी दिली आहे.

स्वच्छतेसाठी एक तारीख-एक तास' या उपक्रमात पुरातत्व विभाग, नगर परिषद, महिला आर्थिक विकास महामंडळ, महिला बचत गट आणि धरित्री विद्यालय आदी शासकीय आणि निमशासकीय संस्थांचा सहभाग असणार आहे. या अभियानात स्वयंस्फुर्तीने श्रमदान व स्वच्छतेसाठी नागरिकांनी www.swachhatahiseva.com या वेबसाईटवर आपले नाव नोंदवावे अथवा आमच्या व्हाट्सअप नंबर 9420923107 वर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंबादास यादव यांनी केले आहे.


 
Top