धाराशिव (प्रतिनिधी)-सामाजिक, शैक्षणिक व उद्योग क्षेत्रात नावलौकीक मिळवुन आपल्या प्रामाणिकपणाची छाप समाजावर टाकलेल्या विक्रम पाटील यांच्यासारख्या चांगल्या लोकांची आज राजकारणात गरज असल्याचे मत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यानी व्यक्त केले. विक्रम पाटील व त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यानी शिक्षक सेवेतुन स्वेच्छानिवृत्ती घेतली, त्यानिमित्त सर्व शिक्षक संघटनाच्यावतीने त्यांचा सेवा गौरव सोहळा आयोजीत केला होता. त्यावेळी खा. ओमराजेनिंबाळकर बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर आमदार कैलास पाटील, माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, शिक्षक संघाचे माजी राज्याध्यक्ष बाळासाहेब काळे, राज्याध्यक्ष केशव जाधव, बाळकृष्ण तांबारे, लायक पटेल, दत्तात्रय गरड, बशीर तांबोळी, लालासाहेब मगर, कल्याण बेताळे, बाळासाहेब वाघमारे, नंदाताई पुनगडे, बिभीषण पाटील सर्व शिक्षक पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी खा. ओमराजेनिंबाळकर म्हणाले की, सध्याची राजकीय परिस्थिती पाहीली तर अनेकांना त्याचा वीट आल्याचे दिसत आहे,अशावेळी चांगल्या लोकांनी राजकारणात येऊन सेवा देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विक्रम पाटील यानी आजवर केलेल्या सर्व क्षेत्राचा अनुभव पाठीशी असल्याने त्यांना निश्चितपणे राजकारणात चांगल काम करता येईल. कष्टाच्या जीवावर व अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्यानी उभा केलेले साम्राज्य सर्वांच्यासमोर आदर्शवत असल्याचे ओमराजे यानी म्हटले.
आमदार कैलास पाटील म्हणाले की, विक्रम पाटील यांना मी लहानपणापासुन बघत आलेलो आहे, त्यांच्यामध्ये नेतृत्व करण्याची क्षमता असुन त्यानी कठिण परिस्थितीचा सामना करुन हे यश मिळवले आहे. शिक्षकांच्या प्रश्न सोडविताना शिक्षक नेत्यानी ते ज्या ठिकाणी सेवा देत आहे, त्याकडे कधीही दुर्लक्ष केले नाही हा जिल्ह्यातील शिक्षक नेत्यांचा गुण राज्यात कोणत्याही जिल्ह्यात नसल्याचे आमदार पाटील यानी सांगितले. विक्रम पाटील यानी राजकारणात येण्याबाबत अनेकांनी सुचना केली असुन त्यांची इच्छा असेल तर निश्चितपणे त्यांना सोबत घेऊन काम करण्याचा दावा देखील आमदार पाटील यानी यावेळी केला. यावेळी सत्काराला उत्तर देताना विक्रम पाटील यानी राजकारणात जाण्याची अजिबात इच्छा नसल्याचे सांगुन आपण कधीही कोणाकडे काहीही मागितले नसल्याचे सांगितले. स्वतःच्या हिंमतीवर आपण आज येथपर्यंत आलो असुन यापुढेही कष्टाच्या जोरावर चांगले काम करणार असल्याचा विश्वास त्यानी यावेळी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विशाल सुर्यवंशी यानी तर आभार खमरोद्दीन सय्यद यानी मानले.