धाराशिव (प्रतिनिधी)-पावसातील खंड व अल्प पावसामुळे जिल्ह्यातील खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून राज्य, राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी निकषांप्रमाणे अनुदान देण्याची प्रक्रिया सुरु करण्याची मागणी आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. अनिल पाटील यांच्याकडे केली आहे.
धाराशिव जिल्ह्यात सरासरीच्या केवळ 45 % टक्के एवढाच पाऊस पडला असून अनेक प्रकल्पातील पाणीसाठ्याने देखील तळ गाठला आहे. झालेला पाऊस देखील नियमित नसून बहुतांश भागात तीन आठवड्यापेक्षा अधिकचा खंड पडला आहे, यामुळे पिके सुकू लागली असून उत्पन्नात मोठ्या प्रमाणात झाली आहे. जिल्हा सनियंत्रण समितीच्या आदेशान्वये कृषी व विमा कंपनीचे पंचनामे सुरु असून अनेक भागात 50 % पेक्षा आधिकचे नुकसान दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातूर असून मदतीच्या प्रतीक्षेत आहे.
राज्य, राष्ट्रीय आपत्ती निवारण निकषाप्रमाणे 33 टक्के पेक्षा जास्त नुकसान असल्यास अनुदान देण्याची तरतूद आहे. या अनुषंगाने आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. अनिल पाटील यांच्याशी चर्चा केली असून शेतकऱ्यांना राज्य, राष्ट्रीय आपत्ती निवारण निकषाप्रमाणे अनुद्येय अनुदान देण्याची प्रक्रिया सुरु करण्याची मागणी केली आहे.