धाराशिव (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबई येथे राष्टवादीच्या जिल्हाध्यक्षांची बैठक झाली. या बैठकीत धाराशिव जिल्ह्याचे प्रभारी जिल्हाध्यक्ष संजय दुधगावकर यांची उपस्थिती होती. यावेळी दुधगावकर यांनी खा. पवार यांची भेट घेऊन जिल्ह्यातील विविध प्रश्नांबाबत माहिती सांगून आपण लक्ष द्यावे, अशी मागणी केली.
यामध्ये जिल्ह्यात सततच्या पावसाचे अनुदान केवायसी पुर्ण करूनही शेतकयांना अनुदान मिळाले नाही. पिकविम्याचे असमान वाटप झाले. पोखरा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ठिबक, स्प्रिंकलर याचे अनुदान शेतकयांना अद्याप मिळालेले नाही. तसेच जिल्ह्यात खरीपाची 5 लाख 39 हजार हेक्टरवर पेरणी झाली. त्यापैकी 4 लाख 73 हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला असून पावसाच्या खंडामुळे सोयाबीनची 70 टक्के फुलगळ झाली आहे. धाराशिव जिल्ह्यातील एकुण 57 महसुली मंडळ असताना केवळ 33 मंडळांना 25 टक्के अग्रिमसाठी घेतले. राहिलेल्या 24 मंडळे वगळलेली आहे, त्याबद्दल माहिती दिली. राहिलेल्या 24 महसुली मंडळांना पण 25 टक्के अग्रिम पिक विमा मिळावा, नियमित कर्ज फेडणाया काही शेतकयांच्या खात्यात अजून 50 हजार रुपये जमा केले नाहीत. ऑगस्ट महिन्यात पावसाचा मोठा खंड पडल्याने शेतकरी अडचणीत आहे. त्याची माहितीही दुधगावकर यांनी खा. पवार यांच्या कानी घातली आहे. याशिवाय इतरही विविध मुद्यावर दुधगावकर यांनी खा. शरद पवार यांच्याशी चर्चा केली असून धाराशिव जिल्ह्याचा दौरा करण्याची मागणी केली आहे.