नळदुर्ग (प्रतिनिधी)- पिकांच्या नुकसानीची विमा कंपनीकडुन भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीची नोंद करणे आवश्यक आहे. मात्र तुळजापुर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी अद्यापही ई-पीक पाहणी केलेली नाही. त्यामुळे प्रशासन थेट आता शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांकडुन ई-पीक पाहणी करून घेत आहेत. नळदुर्गचे मंडळ अधिकारी जयंत गायकवाड यांनी सर्व शेतकऱ्यांनी आपले पुढील नुकसान टाळण्यासाठी दि.30 ऑगस्ट पर्यंत ई-पीक पाहणी करून घ्यावे असे आवाहन केले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे, उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे आणि तुळजापुरचे तहसिलदार यांच्या आदेशानुसार नळदुर्ग मंडळातील आणि अणदुर परीसरातील सर्व शेतकऱ्यांनी तात्काळ ई–पीक पाहणी करावी अन्यथा होणाऱ्या नुकसानीस शेतकरी स्वता जबाबदार राहतील.शेतकऱ्यांनी आपले नुकसान टाळण्यासाठी ई–पीक पाहणी करून घेणे गरजेचे आहे असे मंडळ अधिकारी जयंत गायकवाड यांनी म्हटले आहे.
दुर्दैवाने आपल्याकडे अपुऱ्या पावसाचे सावट आहे. त्यामुळे पीक नुकसान मदत जाहीर झाल्यास सात बाऱ्यावर पिकाची नोंद असल्याशिवाय मदत मिळणार नाही, विमा देखील मिळणार नाही. त्यामुळे शासकीय मदततीसाठी,विमा मिळण्यासाठी प्रत्येकाने मोबाईलवरून ई–पीक पाहणी अँपद्वारे सात बाऱ्यावर पिकाची नोंद करणे अनिवार्य आहे. एका मोबाईलवरून 100 शेतकऱ्यांच्या पिकाची नोंदी होत असल्यामुळे सर्व युवकांनी त्यांच्या घरच्या सर्व आठ अ खात्यांची ई–पीक पाहणी करावी जेणेकरून कोणीही शासकीय योजनेपासुन/मदतीपासुन वंचित राहणार नाही असे जयंत गायकवाड यांनी म्हटले आहे.