नळदुर्ग (प्रतिनिधी)- समाजाच्या जडणघडणीत पत्रकारांचे योगदान मोठे आहे. प्राचिन काळापासुन पत्रकारीता चालत आली आहे. वाल्मीकीनीही पत्रकाराची भुमिका योग्यपणे निभावल्यानेच रामायण समाजासमोर आले असल्याचे ह.भ.प.व प्रसिद्ध निरूपणकार रुपालीताई सवने (परतुरकर) यांनी नळदुर्ग शहर पत्रकार संघाच्या वतीने आयोजित केलेल्या सत्कार समारंभ कार्यक्रमात बोलतांना म्हटले.

नळदुर्ग येथे नंदकुमार डुकरे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. उषाताई डुकरे यांच्या संकल्पनेतुन सुरू करण्यात आलेल्या श्रीमद भागवत सप्ताहानिमित्त ह.भ. प.व प्रसिद्ध निरूपणकार तसेच समाज प्रबोधनकार रुपालीताई सवने या नळदुर्ग शहरात दि. 1 ऑगस्ट पासुन भागवत कथा सांगत आहेत. दि. 3 ऑगस्ट रोजी बालभीमराव मुळे गुरुजी यांच्या निवासस्थानी निरूपणकार रूपालीताई सवने तसेच हा भव्य दिव्य भागवत सप्ताह सोहळा नळदुर्ग शहरात पहिल्यांदा आयोजित केल्याबद्दल नंदकुमार डुकरे यांचा शहर पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करून त्यांचा गौरव करण्यात आला. शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे, पत्रकार विलास येडगे, तानाजी जाधव, उत्तम बनजगोळे, दादासाहेब बनसोडे,अमर भाळे यांनी रुपालीताई व नंदकुमार डुकरे यांचा सत्कार केला. यावेळी बालभीमराव मुळे, सुभद्राताई मुळे,सरदारसिंग ठाकुर, शोभा ठाकुर, सुनिल उकंडे, किरण डुकरे, अमोल सुरवसे यांच्यासह नागरीक उपस्थित होते.

 
Top