धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. म्हणून हा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्यात यावा यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याची माहिती काँग्रेसचे माजी मंत्री, नेते आ.अमित(भैय्या) देशमुख यांनी धाराशिव येथे पत्रकार परिषदेत दिली.
धाराशिव येथे गांधी स्मृती भवन येथील काँग्रेस कार्यालयाच्या सभागृहात रविवारी (दि.13) काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होेते.आ.पाटील म्हणाले की, उस्मानाबाद लोकसभेची जागा काँग्रेस पक्षाला सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. कार्यकर्त्यांच्या एकविचारातून जे नाव समोर येईल त्या नावाची शिफारस आम्ही करू. अखिल भारतीय काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनियाजी गांधी, खा.राहुलजी गांधी, राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुनजी खर्गे, प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले आणि इतर पदाधिकार्यांसमवेत चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
यावेळी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. धीरज पाटील, पक्षाचे निरीक्षक विश्वनाथ चाकोते, माजी जिल्हाध्यक्ष विश्वास शिंदे, माजी आमदार वैजनाथ शिंदे, लातूर जिल्हाध्यक्ष श्रीशैलय उटगे, मुख्य संघटक राजाभाऊ शेरखाने, जिल्हा कार्याध्यक्ष खलील सय्यद, प्रदेश सचिव दिलीप भालेराव, सरचिटणीस अमर खानापुरे, प्रदेश सचिव जितेंद्र देहाडे, मांजरा शुगर उपाध्यक्ष रवी काळे, युवक काँग्रेस प्रदेश सचिव अभिजित चव्हाण, प्रदेश प्रवक्ते हनुमंत पवार, जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश आष्टे, माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, तालुकाध्यक्ष रोहित पडवळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ.देशमुख म्हणाले की, धाराशिव जिल्ह्यात कॉग्रेस पक्षाला मानणारा मोठा वर्ग आहे. यापूर्वी या मतदारसंघातून खासदार, आमदार काँग्रेस पक्षाचे निवडून आलेले आहेत. म्हणून ही जागा काँग्रेस पक्षाला सोडावी याकरिता आम्ही आग्रही आहोत. यापुढील निवडणुकीमध्ये धाराशिव लोकसभा मतदारसंघा खासदार हा काँग्रेस पक्षाचा असेल, असा दावाही त्यांनी केला.