धाराशिव (प्रतिनिधी)-जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा खंड पडला आहे. त्यामुळे पिकाची उत्पादकता घटनार आहे. 1 रूपयाचा पीकविमा काढून पीक संरक्षण केल्यामुळे व केंद्र व राज्य सरकारच्या एनडीआरएफ, एसडीआरएफ यांच्या अनुदानासह पीकविमा शेतकऱ्यांना मिळेल. शेतकऱ्यांना योग्य प्रमाणात पैसे मिळणार असल्यामुळे हाताश व निराश कोणत्याही शेतकऱ्यांनी होवू नये असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, माजी नगराध्यक्ष सुनिल काकडे, माजी उपनगराध्यक्ष अभय इंगळे, राजसिंह राजेनिंबाळकर आदी उपस्थित होते.
प्रतिष्ठान भवनमध्ये सोमवार दि. 28 ऑगस्टच्या सायंकाळी पत्रकार परिषदेत बोलताना आमदार पाटील म्हणाले की, पावसाअभावी जिल्ह्यात भयानक परिस्थिती आहे. परंतु काही अन्यायकारक निषकामुळे 33 महसूल मंडळामध्ये पंचनामे सुरू आहेत. तर उर्वरित 24 महसूल मंडळामध्ये पंचनामे करा असे प्रशासनाला सांगितले आहे. त्यामुळे कोणावरही अन्याय होणार नाही. 57 महसूल मंडळाचे पंचनामे करून प्रशासनाने राज्य सरकारकडे पाठवावे. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री संवेदनशील आहेत. ते निश्चित शेतकऱ्यांना मदत करतील असे आमदार पाटील यांनी सांगितले.
रेल्वे भूसंपादनाचा योग्य मोबदला मिळेल
सोलापूर-तुळजापूर-धाराशिव रेल्वे मार्गात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत त्यांना योग्य मोबदला मिळेल. काही लोक राजकीय पोळी भाजण्यासाठी शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत. एखाद्या शेतकऱ्याच्या भूसंपादनाची नोंद चुकीची झाल्यास त्याने लेखी जिल्हाधिकाऱ्यांना द्यावे, कोणत्याही शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही. एमआयडीसीपेक्षा चांगला मोबदला शेतकऱ्यांना मिळेल असे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
बसस्थानक, क्रिडा संकूलमध्ये लक्ष घालणार
धाराशिव येथील बसस्थानक तीन हेक्टरमध्ये उभा करण्याचे निश्चित झाले असून, त्यामध्ये बसस्थानक, बसडेपो, एसटी कर्मचारी वसाहत त्याचबरोबर मोठे हॉटेल, 200 दुकाने असा एकंदर आराखडा तयार केल्या असून, 50 ते 60 कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. यामध्ये काही भाग बीओटी तत्वावर करण्याचे नियोजन असल्याचे सांगितले. तर तुळजाभवानी क्रिडा संकूलामध्ये सुधारणा करणार असून, पुणे बालेवाडी येथील क्रिडा संकूल ज्याने उभारले त्यांच्याकडून आराखडा मागविण्यात येणार असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.