धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यासाठी खरीप हंगाम वर्ष 2022 करीता जिल्हाधिकारी धाराशिव यांनी भारतीय कृषी विमा कंपनी या कंपनीशी करार करून केंद्र सरकारने ही कंपनी धाराशिव जिल्ह्याकरिता नियुक्त केली आहे. सदर कंपनीकडे वर्ष 2022 या वर्षांमध्ये 502032.54 हेक्टर वरील पिक संरक्षित केले होती. या कंपनीकडे केंद्र सरकारने केंद्राचा हिसा 227.51 कोटी तसेच राज्य सरकारचा हिस्सा 227.51 कोटी रुपये याव्यतिरिक्त शेतकऱ्यांचा 51.2 कोटी एकून 506.22 कोटी रुपये कंपनीच्या खात्यावरती वर्ग केले होते. या कंपनीने संरक्षित केलेल्या क्षेत्राचे प्रत्यक्ष स्थळपाहनी केली होती या स्थळ पाहणी करिता कंपनीचे प्रतिनिधी तसेच कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचार्ऱ्यांनी संयुक्त पंचनामे केले होते तसेच पंचनामे केल्यानंतर शेतकऱ्यांनी नुकसान झालेल्या क्षेत्राचे कंपनीच्या संकेतस्थळावरती माहिती पूर्वसूचनेद्वारे दिली होती. तदनंतर धाराशिव जिल्ह्याकरता नियुक्त केलेल्या कंपनीने सोयाबीन पिकाच्या नुकसानी पोटी केवळ 328 कोटी रुपये एवढी रक्कम मंजूर केली ; हे करत असताना कंपनीने अत्यंत अन्यायपूर्वक रित्या असमान पद्धतीने विमा मंजूर केला.
एकाच क्षेत्रामध्ये क्षेत्र असलेल्या एका शेतकऱ्याला दहा हजार रुपये व त्याच क्षेत्रातील दुसऱ्या शेतकऱ्यासाठी दोन ते तीन हजार रुपये अशा पद्धतीने विमा मंजूर करण्यात आला होता. पीक काढण्यास आल्यानंतर परतीच्या मान्सून पावसाने सोयाबीन पिकाचे 2022 मध्ये प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान केले होते. कंपनीने जे पंचनामे केले होते ते पूर्णतः वस्तुनिष्ठ स्वरूपाचे पंचनामे नसून त्या पंचनाम्यावरती जिल्हा कृषी अधिकारी व कृषी कर्मचाऱ्यांच्या बोगस सह्या केल्याचे निदर्शनास आले. शेतकऱ्यांनी माहितीच्या अधिकारातून पंचनामेच्या प्रति मागवल्यानंतर ही माहिती समोर आली तसेच आम्ही विमा कंपनीकडे वारंवार मागणी करूनही पंचनामाच्या प्रती उपलब्ध करून दिल्या नाहीत कंपनीकडे पंचनामेच्या प्रतींची मागणी केली असता कंपनीच्या झालेल्या करारामध्ये अटी व शर्तीनुसार पंचनामेच्या प्रती देण्याचे तरतूद नसल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले परंतु प्रत्यक्षात सदर पंचनामे हे कंपनीच्या संकेतस्थळावरती पंचनामे झाल्यापासून पंधरा दिवसाचे आत उपलब्ध करून देण्याचे कंपनीवर बंधनकारक असताना कंपनीने याकडे सविस्तर डोळे झाक केल्याचे दिसते.
धाराशिव कळंब मतदार संघाचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी सदर प्रकरण विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित करून राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीमध्ये चर्चा करण्यास चर्चा करण्यासंदर्भात तारांकित प्रश्न पावसाळी अधीवेशना दरम्यान केला होता. या प्रश्नाच्या अनुषंगाने राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीने मागील आठवड्यामध्ये सुनावणी घेतली. राज्य तक्रार निवारण समितीने सदर कंपनी ही केंद्राच्या मालकीची असून राज्य सरकार यामध्ये हस्तक्षेप करू शकत नसल्याचे म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या हक्काचा 328 कोटी रुपये एवढा उर्वरित विमा मंजूर करणे संदर्भात तसेच पंचनामेच्या प्रती उपलब्ध करून देण्याबाबत माननीय खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केंद्रीय कृषिमंत्री ना. नरेंद्र सिंग तोमर यांना सदर कंपनीवर कारवाई करणे बाबत पत्राव्दारे विनंती केली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या हक्काचा विमा मिळेपर्यंत आपण पाठपुरावा करणार असल्याचे खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी कळविले आहे.