धाराशिव (प्रतिनिधी) - छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास इयत्ता चौथीच्या शिवछत्रपती या पाठ्यपुस्तकात देण्यात आलेला आहे. त्यामध्ये पाठ क्रमांक नऊ प्रतापगडावरील पराक्रम या पाठात शिवरायांचा भेटीला जाताना बरोबर पंताजी गोपीनाथ आणि जिवाजी महाला संभाजी कावजी ,येसाजी कंक, कृष्णाजी गायकवाड, सिद्धी इब्राहिम इत्यादी दहा अंगरक्षक होते असा उल्लेख आहे. वास्तविक इत्यादी हा शब्द न घेता काताजी इंगळे, कोंडाजी कंक, संभाजी करवर, सुरजी काटके विसाजी मुरंबक या सर्व दहा अंगरक्षकांची नावे देणे आवश्यक होते. पाठ्यपुस्तक मंडळाने ही चूक दुरुस्त करून दहा अंगरक्षकांची नावे समाविष्ट करावी. इत्यादी हा शब्द वापरणे म्हणजे पाच अंगरक्षकांचा अवमान करण्यासारखे आहे.
याकरिता शासन स्तरावरून संबंधित विभागाला आदेशित करावे यासाठी आज जिल्हाधिकारी व प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांना निवेदन देण्यात आले व लवकरात लवकर याची दखल घेऊन इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकात या गोष्टीचा समावेश करावा अन्यथा संभाजी ब्रिगेड तीव्र आंदोलन करेल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे यावेळी निवेदन देताना संभाजी ब्रिगेड उपजिल्हाध्यक्ष आकाश मुंडे , संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष आदित्य देशमुख, प्रशांत सावंत,महेश इंगळे,अभिजीत जगताप, अमर घोडके, शुभम चव्हाण आदी उपस्थित होते.