धाराशिव (प्रतिनिधी) - उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य तरुण कार्यकर्त्याला कॅबिनेट मंत्रीपदाची संधी दिलेली आहे. तसेच धाराशिवची खास करून माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे. दरम्यान मंत्री संजय बनसोडे व आमदार विक्रम काळे यांच्या उपस्थितीत पदावरून पदाधिकाऱ्यांत वाद झाल्याचे पहायला मिळाले. यावेळी आमदार विक्रम काळे यांनी गोंधळ करणाऱ्या कार्यकर्त्यांना आपण पक्षात नाही आलात तरी चालेल असे सुनावले.
धाराशिव शहरातील सुनील प्लाझा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन मंत्री बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आ. विक्रम काळे, जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे, प्रदेश चिटणीस सुरेश पाटील, सुरेश बिराजदार, गोकुळ शिंदे, आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना मंत्री बनसोडे म्हणाली की, आज देशांमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या आठ ते नऊ वर्षे सरकार असून मोदींचा विकासाचा चमत्कार पाहिलेला आहे. ते ज्याप्रमाणे जगात सर्वात वेगाने देशाचा विकास करीत आहेत. त्या पद्धतीनेच महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे यासाठी आम्ही भाजप सोबत जाण्याची भूमिका स्विकारली असल्याचे त्यांनी नमूद केले.
धाराशिव येथील क्रीडा संकुल हे पवार यांच्या संकल्पनेतील बारामतीच्या क्रीडा संकुलाच्या धर्तीवर करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची सर्व टीम अतिशय जोमाने काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. तर या जिल्ह्यातील लोकसभेची जागा महायुतीच्या माध्यमातून लढविली जाईल.
राष्ट्रवादी काँग्रेस (अप) पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर
मंत्री बनसोडे यांच्या हस्ते युवक जिल्हाध्यक्ष दिग्विजय शिंदे, धाराशिव तालुकाध्यक्षपदी प्रशांत फंड, शहराध्यक्षपदी सचिन तावडे, महिला तालुकाध्यक्षपदी अप्सरा पठाण, परंडा तालुकाध्यक्षपदी अमोल काळे, भूम तालुकाध्यक्षपदी रामराजे साळुंके, परंडा तालुका कार्याध्यक्षपदी विजयसिंह मोरे, बिभीषण खुणे, भूम तालुका कार्याध्यक्षपदी दादासाहेब दळवे, परंडा तालुका उपाध्यक्षपदी दादासाहेब बारस्कर, अतुल गोफणे, धाराशिव-कळंब विधानसभा अध्यक्षपदी मोहन मुंडे, धाराशिव महिला तालुकाध्यक्षपदी अप्सरा पठाण, सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी अतुल जगताप, सोशल मीडिया जिल्हाध्यक्षपदी सुहासराव मेटे, माजी जिल्हा सैनिक सेलच्या जिल्हाध्यक्षपदी मच्छिंद्र क्षिरसागर, जिल्हा उपाध्यक्षपदी नानासाहेब पवार, सहसचिवपदी राजाभाऊ जानराव, तुळजापूर तालुकाध्यक्षपदी विनोद जाधव, धाराशिव शहराध्यक्षपदी विक्रम कांबळे, डाळींब युवक गट प्रमुखपदी मोतीलाल चव्हाण, वाशी ओबीसी सेल तालुकाध्यक्षपदी चिदंबर अवधूत, वाशी तालुका उपाध्यक्षपदी विनोद माने, भूम- परंडा- वाशी विधानसभा उपाध्यक्षपदी सुरेश भांडवले यांची निवड करण्यात आली आहे.