नळदुर्ग (प्रतिनिधी)- नळदुर्ग येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना निकृष्ठ दर्जाचे तसेच बेचव जेवण देणाऱ्या तसेच विद्यार्थ्यांशी अरेरावीने वागणाऱ्या वस्तीगृहातील कर्मचाऱ्यांवर तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करून वस्तीगृहातील गरीब विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे जेवण व सुविधा मिळाव्यात यासाठी संबंधित विभागाला आदेश द्यावेत अशी मागणी होत आहे.
नळदुर्ग येथे मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या सोईसाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वस्तीगृह सुरू करण्यात आले आहे. हे वस्तीगृह शासनाच्या प्रशस्त इमारतीमध्ये सुरू आहे. सध्या या वस्तीगृहात 40 विद्यार्थ्यांचे ऍडमिशन असले तरी फक्त 20 विद्यार्थीच या वस्तीगृहात आहेत. या 20 विद्यार्थ्यांनाही याठिकाणी चांगल्या दर्जाचे जेवण मिळत नाही अतीशय बेचव व निकृष्ठ दर्जाचे जेवण विद्यार्थ्यांना दिले जाते. विद्यार्थ्यांनी याबाबत कुठेही तक्रार करू नये यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जातो. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी याबाबत कुठे तक्रार केली तर तुमचा प्रवेश रद्द केला जाईल अशी धमकी येथील कर्मचारी देत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. या वस्तीगृहातील स्वयंपाक तयार करणारे स्वयंपाक करीत असताना हातावर मळून तंबाखु खाणे हाताच्या बोटाने तोंडातील तंबाखु बाहेर काढुन त्याच हाताने विद्यार्थ्यांना जेवण वाढणे, चपात्या लाटणे असा प्रकार करतात. त्यामुळे आम्हाला किळसवाणे वाटत असल्याचे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.
या वस्तीगृहात बीडचा ठेकेदार भाजीपाल्याचा पुरवठा करतो तर कडधान्य व इतर किराणा मालाचा पुरवठा धाराशिवचा ठेकेदार करतो. हा प्रकार म्हणजे “उंटावरून शेळ्या हाकल्यासारखा आहे“. चपातीसाठी लागणारा गहू किंवा गव्हाचे पीठ अतीशय निकृष्ठ दर्जाचे याठिकाणी पुरवठा होत असल्याने चपात्या अतीशय खराब केल्या जातात. याठिकाणी कार्यरत असणाऱ्या स्वयंपाक करणाऱ्याने याची वरीष्ठांकडे अनेकदा तक्रार केली. तरीही चांगल्या दर्जाचे साहित्य याठिकाणी येत नाही असे स्वयंपाक करणाऱ्यांनी म्हटले आहे.
वर्षानुवर्षे याच ठिकाणी ठाण मांडुन बसलेल्या कर्मचाऱ्यांची येथुन तात्काळ उचलबांगडी करून याठिकाणी विद्यार्थीप्रिय कर्मचाऱ्यांची नेमणुक करावी तसेच या वस्तीगृहाला भाजीपाला,कडधान्य व इतर किराणा मालाचा पुरवठा करणाऱ्या ठेकेदारांचा हा ठेका रद्द करून चांगल्या दर्जाचे साहित्य पुरविणाऱ्या ठेकेदाराला याचा ठेका द्यावा अशी मागणी होत आहे. या वस्तीगृहात विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी देण्यात येणारी पुस्तके ही जुनेच दिले जाते. चालु घडामोडीचे पुस्तके ही जुनेच दिले जाते हा विद्यार्थ्यांवर अन्यायच आहे. निदान चालु घडामोडी वरील पुस्तके तरी नवीन द्यावेत अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.