धाराशिव (प्रतिनिधी)- लोहारा (बु.) नगर पंचायत हद्दीत सन 2018 ते ऑगस्ट 2023 या कालावधीत झालेल्या नियमबाह्य गुंठेवारी व ले-आऊट प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी नगरसेवक प्रशांत बब्रुवान काळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी (दि.29) सुरू केेलेले उपोषण आंदोलन महसूल प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले.
या प्रकरणाची दखल घेऊन निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार यांनी लोहारा नगरपंचायतच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र दिले असून उपोषणकर्त्यांनी नमूद केलेल्या मुद्यांनुसर सविस्तर खुलासा कागदपत्रांसह तात्काळ सादर करावा, असे आदेश दिले आहेत. त्यानंतर नगरसेवक काळे यांनी उपोषण आंदोलन स्थगित केले. यावेळी काँग्रेसचे जिल्हा संघटक राजेंद्र शेरखाने, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, महेबूब पटेल, समीयोद्दीन मशायक, सिद्धार्थ बनसोडे, लोहारा (बु.) नगरपंचायतचे नगरसेवक, आरिफ खानापुरे, नगरसेवक दीपक मुळे, माजी नगरसेवक हरी लोखंडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.