धाराशिव (प्रतिनिधी)- रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील ओमळी येथील नाभिक समाजातील कु. निलिमा सुधाकर चव्हाण यांच्या मृत्यूची कसून चौकशी करण्यात यावी मागणीसाठी अखिल भारतीय जिवा सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, मौजे ओमळी, ता. चिपळूण जि. रत्नागिरी येथील एका तरूणी ही नाभिक समाजातील कन्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या दापोली शाखेत नोकरीला होती. शनिवार दि. 29 जुलै 2023 रोजी ती दापोली एस. टी. डेपोतून चिपळूनकडे जाणार्या बसमध्ये बसली होती. मात्र ती चिपळूनला पोहोचलीच नाही.
निलिमा अचानक गायब होणे, तिचा मृतदेह विद्रूप अवस्थेत खाडी आढळून येणे यामुळे या प्रकरणात अतिप्रसंग व घातपाताची शक्यता असल्याचे दिसून येते. त्यामुळे याचा योग्य प्रकारे तपास होणे आवश्यक आहे. तथापी या प्रकरणी अगोदर पासून नकारात्मक व असहकार्याची भुमिका घेणार्या दापोली पोलीसांकडून योग्य प्रकारे तपास होताना दिसून येत नाही. मृतदेह सापडून चार दिवस उलटून गेलीत तरीही गुन्हेगाराला पकडण्यास पोलीसांना यश आलेले नाही. शिवाय पोलीसांचा त्या दिशेने तपास सुरु असल्याचे दिसून येत नाही. ही गंभीर बाब लक्षात घेऊन स्वतंत्र तपास यंत्रणेकडून याचा तपास होणे आवश्यक आहे. त्याबाबत आपण आदेश देऊन कु. निलिमा सुधाकर चव्हाण आणि तिच्या परिवाराला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.
अखिल भारतीय जिवा सेना जिल्हाध्यक्ष नामदेव वाघमारे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मुक्ता राऊत, शुभांगी साडेकर, सुरेखा, वाघमारे, सचिन मोरे, रविंद्र राऊत, गोवर्धन श्रीसागर, प्रशांत लाडूळकर, मनोज लाडुळकर, सचिन पवार, विशाल जगदाळे, सुजित गोरे, कृष्णाली राऊत, अक्षदा वाघमारे, गोविंद साडेकर इत्यादींच्या निवेदनावर स्वाक्षर्या आहेत.