नळदुर्ग (प्रतिनिधी)- नळदुर्ग येथील उपजिल्हा रुग्णालयात दि.15 ऑगस्टपासुन मोफत उपचार सुरू झाल्याने ओपीडीत येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मोफत उपचार सुरू होण्यापुर्वी या उपजिल्हा रुग्णालयात 70 ते 75 रुग्णांवर उपचार केले जात होते. मात्र मोफत उपचार सुरू झाल्यानंतर ओपीडी दररोज 150 ते 175 होत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. ए.बी. बागल यांनी दिली आहे.

राज्यसरकारने सर्वसामान्यांना केंद्रबिंदु मानुन सर्व शासकीय रुग्णालयात मोफत उपचार सुरू केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा निर्णय ऐतिहासिक व क्रांतीकारक व सर्वसामान्यांच्या हिताचा आहे. यापुर्वी शासकीय रुग्णालय असले तरी इसीजी, एक्सरे, सीटी स्कॅन, सोनोग्राफी आदी तपासण्यांना शुल्क आकारले जात होते. परंतु आता या सर्व सेवा सुविधा निशुल्क करण्यात आल्या आहेत.

सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत असलेल्या सरकारी रुग्णालयामध्ये निशुल्क रुग्ण सेवा लागु करण्यात आली आहे. ओपीडीसाठी पुर्वी 10 रुपये शुल्क द्यावे लागत असे. मात्र आता एकही रूपाया द्यावा लागत नाही. ईसीजी, एक्सरे, सिटीस्कॅन यासारख्या तपासण्याही आता मोफत होत आहेत. निशुल्क रुग्णसेवा सुरू झाल्यापासुन उपजिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. रुग्णांसाठी औषधांचा साठाही पुरेशा प्रमाणात आहे.त्यामुळे नळदुर्ग शहर व परीसरातील रुग्णांनी नळदुर्ग येथील उपजिल्हा रुग्णालयात येऊन मोफत उपचार करून घ्यावेत असे आवाहन उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ.इस्माईल मुल्ला यांनी केले आहे.

उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. इस्माईल मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा रुग्णालयाचा कारभार अतीशय चांगल्या प्रकारे सुरू आहे. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना याठिकाणी चांगले उपचार मिळावेत यासाठी डॉ. मुल्ला हे नेहमी प्रयत्नशील असतात. रुग्णालयाचा कारभार चांगला सुरू आहे मात्र आजही या इमारतीचे कांही कामे अपुर्ण आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने ही कामे लवकर पुर्ण करून देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर या रुग्णालयातील ज्या रीक्त जागा आहेत त्या तात्काळ भरावेत. हे उपजिल्हा रुग्णालय पुर्ण क्षमतेने सुरू होणे अत्यंत गरजेचे आहे.

दि.24 ऑगस्ट रोजी या उपजिल्हा रुग्णालयात अधीक्षक डॉ. इस्माईल मुल्ला व डॉ. वडणे यांनी पहिले सिझेरीयन ऑपरेशन केले. बाळ आणि माता यांची प्रकृती ठणठणीत आहे. नळदुर्गच्या इतिहासात पहिल्यांदाच सिझेरीयन ऑपरेशन झाले आहे. उपजिल्हा रुग्णालयात हे सिझेरीयन ऑपरेशन झाल्याने यापुढील काळात गरीबांना याचा मोठा फायदा होणार आहे. सिझेरीयन ऑपरेशन यशस्वीपणे केल्याबद्दल डॉ. मुल्ला व डॉ. वडणे यांचे नळदुर्ग शहरांतुन अभिनंदन होत आहे.


 
Top