नळदुर्ग (प्रतिनिधी)- जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्यातील हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी अशी मागणी नळदुर्ग शहर पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन संघाच्या वतीने नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षकानां देण्यात आले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, पत्रकार संदीप महाजन यांनी एका घटनेच्या संदर्भात बातमी प्रकाशित केली होती. याचा राग मनात धरून चार ते पाच माथेफिरू गावगुंडांनी शिवीगाळ करीत महाजन यांना अमानुषपणे मारहाण केली आहे. या घटनेचा नळदुर्ग शहर पत्रकार संघाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला असुन मारहाण करणार्‍या हल्लेखोरांवर पत्रकार संरक्षण कायद्यान्वये कठोर कारवाई करून पत्रकार संदीप महाजन यांना न्याय मिळवुन द्यावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. हे निवेदन पोलिस उपनिरीक्षक पटेल यांना देण्यात आले आहे. या निवेदनावर शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे, सचिव तानाजी जाधव, पत्रकार विलास येडगे,लतिफ शेख उत्तम बनजगोळे, भगवंत सुरवसे,दादासाहेब बनसोडे, मुजम्मील शेख यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

 
Top