तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील कटारे स्पिनिंग मिलची राहिलेली ग्रॅज्युएटी (उपदान) मिळण्यासाठी कटारे सूत गिरणी कामगारांनी गेल्या 6 महिन्यापूर्वी मिलच्या गेटसमोर उपोषण केले होते. 2 ते 3 महिन्यात ही देणी देण्याचे कटारे समुहाचे सर्व्हेसर्वा किशोर कटारे यांनी आश्वासन दिले होते. मात्र त्यांच्याकडून अद्यापपर्यंत हिशोब पूर्ण झाला नव्हता. यामुळे रविवार, दि. 6 जुलै 2023 रोजी कामगार संघटना पदाधिकार्यांनी पुन्हा कटारे यांच्याशी चर्चा केल्यानंतर येत्या 8 दिवसांत राहिलेल्या सर्वच कामगारांची ग्रॅज्युएटी देणार असल्याचे आश्वासन कामगार युनियनला दिल्याची माहिती कामगार संघटना अध्यक्ष शाहीर गायकवाड, सतीश माळी, तमीज पटेल यांनी दिली.
कंपनी बंद पडून अनेक वर्षे झाले तरी कटारे मिल व्यवस्थापनाकडून कामगारांची उपदानाची रक्कम देण्यात आली नव्हती. मालकांकडे उपदानाची रक्कम मागूनही मिळत नसल्याने अनेक कामगारांनी थेट कोर्टातून हे उपदान मिळवून घेतले होते. राहिलेल्या कामगारांनी राष्ट्रवादीचे नेते तथा माजी सैनिक शिवाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली लोकशाही मार्गाने कटारे स्पिनिंग मिल गेटसमोर या उपदानाची रक्कम मिळणेसाठी 1 फेब्रुवारी 2023 पासून बेमुदत उपोषणाचा मार्ग धरला होता. उपोषणाचे 5-6 दिवस झाल्यानंतर किशोर कटारे यांनी जेष्ठ पत्रकार अविनाश गायकवाड, सपोनि सचिन पंडित यांच्या माध्यमातून झालेल्या कामगार बैठकीत कामगारांना येत्या 4 महिन्यात उपदान देण्याचे मान्य केले होते.