धाराशिव (प्रतिनिधी)- केंद्र शासनाने 2027 पर्यंत शुन्य कुष्ठरोग प्रसार हे आव्हान स्विकारले आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जून व जुलै महिन्यात कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र (कुसुम) हा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता.
या मोहिमेअंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील वीटभट्टी कामगार, खाण कामगार, कारागृहातील व्यक्ती, आश्रमशाळा, ऊसतोड कामगार, स्थलांतरीत व्यक्ती आदी समाजापासून दूर राहणार्या वंचित घटकापर्यंत प्रयत्न करण्यात आला. त्यामध्ये 14 हजार 630 लोकांची तपासणी करण्यात आली. त्यात 226 संशयीत रुग्ण सापडले. त्यांची वैद्यकीय अधिकार्यांमार्फत तपासणी करुन 3 सांसर्गिक व 26 असांसर्गिक रुग्णांचा शोध घेऊन औषधोपचार सुरु करण्यात आला आहे. कुसुम ही मोहिम जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतिश हरीदास, आरोग्य सेवा (कुष्ठरोग) सहाय्यक संचालक डॉ.एम.आर.कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे राबविण्यात आली.