धाराशिव (प्रतिनिधी)- पालकमंत्र्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीबाबत खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ.कैलास घाडगे पाटील यांना कोणीही कळविले नव्हते. म्हणून ते बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. खासदार आणि आमदार हे सदैव जनतेच्या संपर्कात असून रात्री-अपरात्री लोकांच्या तक्रारी जाणून घेऊन त्या सोडविण्याचे काम करीत आहेत. तरीसुद्धा खासदार आणि आमदार महोदयांवर शिंदे गटाच्या पदाधिकार्यांनी केलेले आरोप चुकीचे असल्याचे सांगून शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखांसह इतर पदाधिकार्यांनी केलेल्या आरोपाचे खंडण शिवसेना शहरप्रमुख सोमनाथ गुरव यांनी केले.
गुरव पुढे म्हणाले की, खासदार आणि आमदारांविषयी बोलताना शिंदे गटाच्या पदाधिकार्यांनी स्वतःच्या मनाला विचारून पहावे. कारण जनतेला माहित आहे की, हे लोक जनतेचे काम करतात. म्हणून जनतेने त्यांना निवडून दिलेले आहे. उलट पालकमंत्र्यांनी त्यांच्या मतदारसंघांमध्ये किती बैठका घेतल्या? किती वेळेस ते आले? कोविड काळात मतदारसंघातील किती लोकांची भेट घेतली? याचेही उत्तर द्यावे. कोविड काळामध्ये खासदारांनी स्वतः कोविड सेंटर सुरू करुन लोकांची काळजी घेतली, हे सर्व जनतेला माहीत असल्याचे गुरव यांनी म्हटले आहे.