धाराशिव (प्रतिनिधी) - दररोज सायकल चालविल्यामुळे मानसिक आरोग्य तर सुदृढ होतेच परंतु हृदयविकार होतच नाही असे संशोधनातून सिद्ध झालेले आहे त्यामुळे सायकल चालविणे ही कोरोना महामारी नंतर निरोगी समाज निर्मितीसाठी आवश्यक असून ती लोक चळवळ व्हावी असे प्रतिपादन तहसिलदार डॉ. शिवानंद बिडवे यांनी केले.
धाराशिव ते कन्याकुमारी हे १४०० किलो मीटर अंतर धाराशिव शहरातील १७ युवकांनी अवघ्या आठ दिवसांमध्ये सायकलस्वारी करून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. त्याबद्दल सन्मान योध्द्यांचा, संदेश राष्ट्रीय एकात्मतेचा या उद्देशाने त्यांचा गौरव करण्यात आला. धाराशिव शहरातील छत्रपती संभाजीराजे कॉम्प्लेक्स येथील मैदानात आयोजित करण्यात आलेल्या गौरव सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी आयोजक धनंजय शिंगाडे, माजी नगराध्यक्ष विश्वास शिंदे, भाऊसाहेब उंबरे, दत्ता बंडगर, माजी उपनगराध्यक्ष राजाभाऊ बागल, सुभाष पवार, नंदकुमार शेटे, लक्ष्मण माने, प्रणिल रणखांब, राजाभाऊ पवार आदी उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ बिडवे म्हणाले की, सर्वात जास्त क्रांतिकारक शोध म्हणजे चाकाचा आहे. चाक म्हणजेच गती कारण चाक जर काढले तर कुठल्याही वाहनाला गती येत नसल्यामुळे कुठलीच प्रगती होणे शक्य नाही. तर शरीर व मन तंदुरुस्त व मजबूत रहावे यासाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम आहेत. मात्र सगळ्यात कमी खर्चाचा सायकल चालवणे हा व्यायाम असून सायकल चालविण्यामुळे शरीराबरोबरच मन देखील कणखर बनते. जे सायकल चालवतात त्यांना हृदयविकाराचे आजार देखील उद्भवत नसल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे जे राष्ट्र प्रगतशील आहेत. त्या राष्ट्रांमध्ये इतर वाहने कमी असून सायकली जास्त असल्याचे त्यांनी नमूद केले. तर धनंजय शिंगाडे म्हणाले की, उस्मानाबाद ते कन्याकुमारी हा सायकल प्रवास १७ जणांनी अनेक अडथळ्यांचे दिव्य पार करुन धाराशिव जिल्ह्याची ओळख कन्याकुमारीपर्यंत निर्माण केली हे महाराष्ट्रासाठी भूषणावह आहे. तसेच या उपक्रमामुळे मनातील मतभेद कमी होण्यास मदत होऊन आपसात जिव्हाळा निर्माण होण्यास नक्कीच प्रेरणा मिळत असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. विशेष म्हणजे शहरातील सर्व नागरिकांनी अशा सायकल स्पर्धा आयोजित करून त्यामध्ये सक्रिय सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी सुर्यकांत आनंदे, दत्ता सुरवसे, राजाभाऊ कळसकर, जिल्हा क्रीडा अधिकारी भैरवनाथ नाईकवाडी, चित्रसेन राजेनिंबाळकर, प्रदीप खामकर, सुरज कदम आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन शिक्षण विस्तार अधिकारी मल्हारी माने यांनी तर उपस्थितांचे आभार शिवसेनेचे शहर संघटक प्रशांत साळुंके यांनी मानले. यावेळी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते........................
धाराशिव ते कन्याकुमारी सायकल स्वारी करणारे चित्रसेन राजेनिंबाळकर, प्रदीप खामकर, अमोल माने, दिग्विजय घुटे-पाटील, पुरुषोत्तम रुक्ममे, रणजीत रणदिवे, दत्तात्रय टेकाळे, सुरज कदम, विशाल थोरात, दीपक वळसे, गणेश एकंडे, अभिजीत पाटील, महेश पवार, इंद्रजीत पाटील, अमोल निरपळ, अजय देसाई व दीपक चव्हाण यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.