नळदुर्ग (प्रतिनिधी) नळदुर्ग येथील श्री क्षेत्र रामतीर्थ येथे पर्यटन विकास योजनेअंतर्गत 10 लाख रुपये खर्च करून करण्यात येत असलेल्या विकास कामांमुळे श्री क्षेत्र रामतीर्थच्या सौंदर्यात मोठी भर पडणार आहे. या कामांमुळे ऐतिहासिक व प्राचिन असलेले श्री क्षेत्र रामतीर्थ भाविकांसाठी आकर्षित ठरणार आहे.

प्रभु श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेले नळदुर्ग येथील श्री क्षेत्र रामतीर्थ हे प्राचीन व पवित्र श्री क्षेत्र म्हणुन ओळखले जाते. सध्या याठिकाणी पर्यटन विकास योजनेअंतर्गत 10 लाख रुपये खर्चाचे विकास काम सुरू आहे. हे काम अंबाजोगाई येथील बळवंत बावणे या ठेकेदारांनी घेतले आहे. त्यांनी हे काम सध्या 80 टक्क्यांपेक्षा जास्त पुर्ण केले आहे. मंदिरासमोर असणार्‍या मंदिराचे महंत स्व.रघुवीर प्रसाद जोशी महाराज यांच्या समाधी स्थळाचे सुशोभीकरण करण्याचे काम सुरू आहे. अतीशय चांगल्या प्रकारे हे काम याठिकाणी असणारे रामभक्त करून घेत आहेत. या कामामुळे श्री क्षेत्र रामतीर्थाचे सौंदर्य आणखी खुलणार आहे. या कामामुळे भाविकांना या ठिकाणी आल्यानंतर प्रसन्न वाटणार आहे. संबंधित ठेकेदाराने हे काम वेळेत पुर्ण करण्याचा संकल्प केला आहे त्यामुळे हे काम लवकर पुर्ण होण्याची शक्यता आहे.

मात्र याच श्री क्षेत्र रामतीर्थ येथे जवळपास 80 लाख रुपये खर्चाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत सुरू आहे. मात्र ठेकेदाराच्या निष्क्रियतेमुळे हे काम गेल्या अनेक महिन्यांपासुन रखडतच पडले आहे. या बंद पडलेल्या कामाकडे ना ठेकेदार फिरकत आहे ना सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी फिरकत आहेत. त्यामुळे हे काम पुर्ण होण्याची शक्यता मावळली आहे.

जिल्हाधिकारी यांनी हे काम अर्ध्यावर का बंद पडले आहे याची चौकशी करून यामध्ये निष्क्रियपणा केलेल्या ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यावर कारवाई करून हे काम दुसर्‍या ठेकेदाराकडुन पुर्ण करून घ्यावे अशी मागणी रामभक्तांनी केली आहे.


 
Top