धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील एकही बाधित शेतकरी पिकविम्यापासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्या,वेळेवर पंचनामे करून पारदर्शक आणि गतिमान काम करा असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी आज खरिप हंगामाच्या 2023 च्या आढावा बैठकीत विमा अधिका-यांना दिले. प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2023 ची जिल्हास्तरीय समिती ची बैठक आज जिल्हाधिकारी डो.सचिन ओम्बासे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यलयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली.यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने,कृषी उपसंचालक अभिमन्यु काशीद, कृषी विकास अधिकारी प्रमोद राठोड,जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक सचिन ससाने, एच डी एफ सी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक हरिओम सोलंके,बाळासाहेब गोपाळ, अमोल मुळे तसेच सर्व तालुका समन्वयक उपस्थित होते.
पंचनामा करण्यासाठी जातांना कृषी विभागास अवगत करणे आवश्यक आहे. पंचनामे गतिमान आणि पारदर्शक व्हावेत यासाठी मनुष्यबळ वाढवा. तसेच तालुका समन्वयकासाठी स्वतंत्र कार्यलय आणि दूरध्वनिची व्यवस्था करावी. एकाच क्षेत्रातील वेगवेगळ्या शिवारात पंचनामे करतांना नुकसानात तफावत येणार नाही याची काळजी घ्या, आणि मिळालेल्या नुकसानीच्या सूचनांचे शंभर टक्के पंचनामे करा, असेही जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.
तसेच सर्वेक्षण अहवाल हा संबंधित कृषि सहायक व शेतकरी यांचे समोरच परिपुर्ण भरुन म्हणजेच शेतकर्याचे नाव, सर्वे नंबर, पिकाचे नाव, पेरणी दिनांक, पिकाची अवस्था, पिकाचे संरक्षित क्षेत्र, बाधीत क्षेत्र, नुकसानीची टक्केवारी, सर्वेक्षणाचा दिनांक इत्यादी बाबी नमूद करुनच सदर सर्वेक्षण अहवालावर कृषि सहायकाची व संबंधित शेतकर्याची स्वाक्षरी घेण्यात यावी. असेही जिल्हाधिकारी ओम्बासे यावेळी म्हणाले.