धाराशिव (प्रतिनिधी)- आजचे जग स्पर्धेचे आहे. अभ्यासातील गुणांना पर्याय नाही. स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर गुण हवेतच, पण कमी गुण मिळाले म्हणून नाराज होऊ नका. आपल्यातील कलागुणांना वाव द्या. आई वडिलांचे स्वप्न मुलांनी पूर्ण करावे. त्यासाठी निर्व्यसनी राहून चांगली पुस्तके वाचा, ज्ञान प्राप्त करा. खरी गुणवत्ता खेड्यापाड्यात आहे. शहरातील सिमेंटच्या जंगलात नाही. शिक्षण हे जगातील सर्वात मोठी संपत्ती आहे असे इतिहास संशोधक डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी बोलताना सांगितले.
झुंजार सेनानी भाई उद्धवराव पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन व छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील दहावी परीक्षा गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी डॉ. श्रीमंत कोकाटे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षा राजर्षी शाहू शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती शशिकलाताई घोगरे होत्या. प्रसंगी क्रांतिसिंह नाना पाटील यांचे नातू अॅड . सुभाष पाटील, सुलभा उद्धवराव पाटील, सत्यभामा पाटील, संस्थेचे कार्याध्यक्ष एम.डी. देशमुख, उपाध्यक्ष अॅड . अविनाशराव देशमुख, सचिव भाई धनंजय पाटील, मुख्याध्यापक पी. एन. पाटील, मुख्याध्यापक एन. व्ही. शिंदे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचा प्रारंभ भाई उद्धवराव पाटील यांच्या पुतळ्यास अतिथींच्या हस्ते पुष्पांजली अर्पण करून करण्यात आली. इयत्ता दहावी परीक्षेत टक्के पेक्षा जास्त गुण घेतलेल्या विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र व भेटवस्तू मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. प्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांना सुलभा उद्धवराव पाटील यांचे कडून घड्याळ भेट देण्यात आले.
भाई उद्धवराव पाटील यांनी राजकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात महाराष्ट्रासाठीच नव्हे तर देशासाठी कार्य केले. त्यांच्या विचारांचा वसा आणि वारसा विद्यार्थ्यांनी जपावा असे आवाहन यावेळी बोलताना श्रीमंत कोकाटे यांनी केले.
आजचे राजकीय वातावरण दूषित झालेले आहे. उच्च शिक्षित माणसानीच सर्वात मोठे भ्रष्टाचाराचे घोटाळे केलेले आहेत. पण भाई उद्धवराव पाटील यांचे कार्य तळागाळातील सर्वसामान्यांसाठी होते. त्यांनी पद, सत्ता, पैसा यांचाकधीच विचार केला नाही. एक संसद पटू, विरोधी पक्ष नेता म्हणून समाजासाठी उत्तम कार्य केले. इतकेच नव्हे तर मुख्यमंत्री पद नाकारणारे एकमेव उद्धवराव पाटील होत असे उदगार क्रांतिसिंह नाना पाटील यांचे नातू अॅड . सुभाष पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले.
विद्यार्थ्यांनी स्वतःचा आत्मशोध घ्यावा, उणिवा तपासाव्यात, दैनंदिन अभ्यासाचे व्यवस्थापन करावे, घरातील जबाबदार्या बरोबरच सामाजिक जबाबदारी विद्यार्थ्यांनी पार पाडत स्वतःची ओळख जगाला करून द्यावी असे संस्थेचे कार्याध्यक्ष एम.डी.देशमुख यांनी बोलताना सांगितले.
छत्रपती शिवाजी हायस्कूल भांडवलशाही तत्त्वावर चालणारी शाळा नसून भाई उद्धवराव पाटील यांच्या विचारावर चालणारी शाळा आहे. विद्यार्थी संख्या जास्त असली तरी शाळांनी आपली गुणवत्ता वेळोवेळी समाजाला दाखवून दिली आहे. विद्यार्थ्यांनी जीवनामध्ये यशस्वी व्हावे असे बोलताना संस्थेच्या कार्याध्यक्षा श्रीमती शशिकलाताई घोगरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये प्राचार्य पी .एन. पाटील यांनी प्रशालेतील विविध परीक्षा व शालेय गुणवत्तेचा आलेख मांडत शाळेच्या निकालाच्या उज्वल परंपरा विषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रवी सुरवसे व श्रीमती यू. एम. शिंदे यांनी केले. आभार पर्यवेक्षक व्ही. के. देशमुख यांनी मानले. सदर कार्यक्रमास प्रशालेतील विद्यार्थी, शिक्षक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.