धाराशिव (प्रतिनिधी) - धाराशिव उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील वाहतूक नियंत्रण निरीक्षक यांच्या दुर्लक्षतेमुळे वाहनधारकांनी राजरोसपणे ओव्हरलोड म्हणजे क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करीत आहेत. मात्र यावर नियंत्रण करण्याचे काम करणारे परिवहन खात्यांच्या अधिकार्‍यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

धाराशिव शहराच्या जवळ हाकेच्या अंतरावर असलेल्या धाराशिव रेल्वे स्थानकामध्ये मालवाहतुकीच्या धक्का या ठिकाणी जवळपास 200 ते 250 मालवाहतूक करणारे ट्रक व टेम्पो उभे असतात. सध्या खरीप हंगाम सुरू असून यासाठी शेतकरी बी-बियाणे व खत मोठ्या प्रमाणात खरेदी करीत असतात. त्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून वेगळ्या खतांच्या आवंटनाची मागणी केल्यामुळे शासन प्रत्येक जिल्ह्याला खत उपलब्ध करून देते. हा खत रेल्वेच्या बोगी मधून धाराशिव येथील मालधक्क्यावर आणून उतरला जातो. त्या मालाचा तेथे उभे असलेल्या ट्रक व टेम्पोमध्ये भरुन जिल्ह्यातील वेगवेगळ्या दुकानदारांना पुरवठा केला जातो. हे वाहनधारक शासनाने निर्गमित केलेल्या जास्त मालाची वाहतूक करत असल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणाहून उचलण्यात येत असलेला माल ज्या वाहनांमध्ये भरण्यात येतो. त्या वाहनांमध्ये किती टन माल भरावा याचे शासनाने 6, 10  व 12  टायरच्या वाहनांची माल वाहतूक करण्याची क्षमता स्पष्टपणे वाहननिहाय निश्चित केलेली आहे. 

मात्र या ठिकाणाहून क्षमतेपेक्षा जास्त म्हणजे 20 ते 35 टन मालाची (खत) वाहतूक करीत आहेत. क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करणार्‍या वाहनावर कारवाई करण्याचे अधिकार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी  यांना असताना ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून कारवाई करण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. विशेष म्हणजे ओव्हरलोड वाहतुकीला 20 हजार रूपये दंडाची शिक्षा आहे. 


 
Top