धाराशिव (प्रतिनिधी)-  शासनाने पाझर तलाव व साठवण तलावाकरिता संपादीत केलेल्या शेत जमिनीचा मावेजा मिळवून देतो म्हणून एका वृद्ध शेतकर्‍याकडून दोन लाख घेताना धाराशिवमधील एका बोगस पत्रकारासह दोघांना एसीबी पथकाने रंगेहात पकडून गुन्हा दाखल केला आहे. 

बाबासाहेब हरिशचंद्र अंधारे, वय 42 वर्षे, संपादक दैनिक मराठवाडा योध्दा, रा. गणपती मंदिर जवळ, आनंदनगर, धाराशिव व 1) अनिरुद्ध अंबऋषि कावळे (खाजगी इसम), वय 52 वर्षे, रा. केकस्थळवाडी, उस्मानाबाद अशी या लाचखोरांची नावे आहेत. 

यातील तक्रारदार वृद्ध शेतकरी (वय 77) यांचे पत्नीच्या नावे असलेली शेत जमीन शासनाने पाझरतलाव व साठवण तलावा करिता संपादीत केलेली असून सदर संपादित जमिनीचा न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे अधिकचा मोबदला प्रांत कार्यालय, उस्मानाबाद येथील अधिकारी व कर्मचारी यांना सांगुन तुमचे संपादित जमीनीचा मोबदला 26,56,017/- रुपये व 4,31,798/- रुपयेचा असे दोन्ही चेक काढुन देण्याकरिता 2,00,000/- रुपये लाच रकमेची  मागणी करून सदर लाच रक्कम पंच साक्षीदार यांचे समक्ष स्वीकारताना ताब्यात घेण्यात आले आहे. सदरबाबत पोलीस ठाणे आनंदनगर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.

हा सापळा अधिकारी - विकास राठोड, पोलीस निरीक्षक  व  पोलीस अंमलदार इफतीकार शेख, दिनकर उगलमुगले, मधुकर जाधव, सचिन शेवाळे, आशिष पाटील, विष्णू बेळे, विशाल डोके,सिद्धेशर तावस्कर, अविनाश आचार्य, नागेश शेरकर, जाकेर काझी, चालक करडे यांनी रचला होता.

 
Top