धाराशिव (प्रतिनिधी)- परंडा तालुक्यातील चिंचपूर बुद्रुक येथील ग्रामपंचायत सदस्याचे सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी दिले आहेत. परंडा तालुक्यातील चिंचपुर बुद्रुक येथील ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत शिवाजी कासारे यांना तीन अपत्य असल्याची तक्रार विद्यमान सरपंच प्रियांका पोपट शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार सादर केली होती .याप्रकरणी चिंचपूर बुद्रुक येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत कासारे यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.
या प्रकरणात सरपंच प्रियांका शिंदे यांनी दिनांक 19 ऑगस्ट 2022 रोजी त्यांचे वकील अॅड. कुलदीपसिंह रेवण भोसले यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे श्रीकांत कासारे यांना तीन अपत्य असल्याची तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी सखोल चौकशी होऊन परंडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी श्रीकांत कासारे यांना तीन अपत्य असल्याचा जिल्हाधिकारी यांच्याकडे अहवाल सादर केला होता. जिल्हाधिकारी यांच्या दालनामध्ये एक वर्ष सुनावणी चालू होती. परंडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या चौकशीमध्ये श्रीकांत कासारे यांना तीन अपत्य असल्याचे पुराव्या अभावी सिद्ध झाले होते .यानंतर 27 जून रोजी जिल्हाधिकारी यांच्यासमोर सुनावणी झाली .या सुनावणीमध्ये श्रीकांत कासारे यांना तीन अपत्य असल्याकारणाने त्यांचे ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 16 सह 14 मधील तरतुदीनुसार ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्यात आले. या प्रकरणात सरपंच प्रियांका पोपट शिंदे यांच्या वतीने अॅड. कुलदीपसिंह रेवण भोसले यांनी युक्तिवाद केला.