नळदुर्ग (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील लोहगाव येथे शेतीच्या वादातून चुलत्याने व दोन चुलत भावानी मिळून पुतण्याचा खून केला. हा प्रकार दि. 29 जून रोजी सकाळी उघडकीस आला. मागील चार ते पाच वर्षापासून मृत व्यक्ती व आरोपींमध्ये शेतीचा वाद आहे. या प्रकरणी नळदुर्ग पोलिसानी तत्परता दाखवत तिन्ही आरोपींना अटक केली आहे.

उमरगा येथे संतोष शिवाजी काटकर आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहेत. गुरूवारी सकाळी 7 वाजता त्यांच्या पत्नी समृध्दी यांच्या मोबाईवर चुलतभाऊ नागनाथ शंकर काटकर याने फोन केला. तुमचा दीर अमोल (वय 34) काल बुधवारी (दि. 28) रात्री आमच्या शेतात गोठ्यासमोर झोपला होता. त्याला सकाळी कितीही हलवले तरी तो झोपेतन उठला नाही. म्हणून मी व माझे वडील शंकर काटकर यांनी अमोलला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी त्याचे पाय आखडले होते. त्यामुळे तो रात्रीच मरण पावला आहे असे सांगितले. तेव्हा संतोष यांनी कुटुंबियांसह तत्काळ लोहगाव गाठले. शेतात गोठ्यासमोर येऊन पाहिले असता अमोल जमिनीवर पडला होता. त्याच्या डोक्याजवळ मार लागलेला होता. डोळ्याभोवती व नाकावर मारहाण केल्याच्या खुणा दिसत होत्या. शेतीच्या वादातूनच हा खून झाल्याची खात्री झाली. यामध्ये चुलते शंकर मारूती काटकर तसेच चुलत भाऊ  नागनाथ शंकर काटकर व सचिन अंकुश काटकर यांनीच संगनमत करून अमोलचा मारहाण करून खून केला. या प्रकरणी संतोष काटकर यांच्या फिर्यांदीवरून गुन्हा दाखल करून तिन्ही आरोपींना अटक केली. सहाय्यक पोलिस निरीक्षक सिध्देश्वर गोरे तपास करीत आहेत. 

यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते यांनी नळदुर्ग पोलिस ठाण्यास भेट देवून या प्रकरणाची चौकशी केली. संतोष व मृत अमोल शिवाजी काटकर यांची लोहगाव शिवारात 7 एकर वडोलोपार्जिंत शेती आहे. शेतातील चारीचा व विहिरीचा प्रविण काटकर यांच्यासमवेत वाद सुरू होता. चुलते शंकर मारूती काटकर यांच्याकडून 14 वर्षापूर्वी 2 एकर जमीन खरेदी केली. जमिनीच्या बाजूला पाटबंधारे खात्याची व सार्वजनिक बांधकाम विभागाची 20 गुंठे जमीन आहे. शिवाजी हे मी तुला विक्री करून दिलेल्या दोन एकर जमिनीपैकी अर्धा एकर जमीन मला सोड नाही तर तुला व तुझ्या भावास मारून टाकीन, अशी धमकी देत होता. यातून त्याने दोघांच्या मदतीने खून केला.



 
Top