धाराशिव (प्रतिनिधी)-भारत राष्ट्र समितीच्या नेतृत्वाखालील सरकारने तेलंगणा राज्यात मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव यांनी शेतकरी, शेतमजूर, ओबीसी व इतर समाजासाठी साडेचारशेहून अधिक लोककल्याणकारी योजना राबविल्या आहेत. त्यामुळे तेलंगणा राज्यातील शेतकरी सुखी-समृद्ध झाला आहे. आता महाराष्ट्र राज्यातील शेतकर्‍यांच्या सुख-समृद्धीसाठी भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्ष सज्ज झाला असून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये मजबूत पक्षसंघटन सुरू असल्याची माहिती भारत राष्ट्र समितीचे विभागीय समन्वयक सोमनाथ थोरात यांनी शुक्रवारी (दि.30) पत्रकार परिषदेत दिली.

धाराशिव येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी रामजीवन बोंदर, ज्ञानेश कामतीकर, अॅड.  विश्वजीत शिंदे, भाई फुलचंद गायकवाड, अर्चना अंबुरे यांची उपस्थिती होती. थोरात म्हणाले की, महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण मोठे आहे. त्यास येथील सरकारचे धोरण कारणीभूत असून हजारो शेतकर्‍यांनी महाराष्ट्रात आत्महत्या केली आहे. शेतकर्‍यांना वीज, पाणी, बी-बियाणे, शेती अवजारे यामध्ये सवलत दिल्यास भारत देश सुजलाम-सुफलाम होणार आहे. म्हणूनच यावेळेस अब की बार किसान सरकार हा नारा देऊन भारत राष्ट्र समिती मैदानात उतरली आहे. तेलंगणा राज्यातील शेतकरी सुखी होत असेल तर त्या राज्यातील शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिकांना मिळणार्‍या सुविधा का मिळू शकत नाहीत? असा सवालही त्यांनी केला. महाराष्ट्रातील शेतकरी, शेतमजुरांच्या कल्याणासाठीच भारत राष्ट्र समिती आता लढा देणार असल्याचे थोरात यांनी सांगितले. यावेळी भारत राष्ट्र समितीचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top