उमरगा (प्रतिनिधी) - स्पर्शच्या आपुलकीच्या व तळमळीच्या आरोग्य सेवेची जाणीव ठेऊन शासन दरबारी पाठपुरावा करून त्यांच्या संपूर्ण अडीअडचणी सोडवण्यासाठी या भागाचा आमदार म्हणून कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली. स्पर्शचा आदर्श घेऊन इतर ग्रामीण रुग्णालयांनी सुद्धा आपल्या आरोग्य सेवेचा दर्जा उंचावून जास्तीत जास्त गरजू जनतेला दर्जेदार आरोग्य सेवा पुरवावी असे प्रतिपादन त्यांनी केले. ऑक्सिजन प्लॅन्ट कडे जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे उर्वरित 400 मीटर सिमेंट रस्ता लवकरच पूर्ण करू असे आश्वासन आ. ज्ञानराज चौगुले यांनी दिले.
रुग्णालयाच्या समोरील बाजूचा 200 मिटर सिमेंटचा रस्ता आ. ज्ञानराज चौगुले यांच्या मार्फत पूर्ण झाला आहे. लोहारा-उमरगा तालुका आ. ज्ञानराज चौगुले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राजाभाऊ गलांडे व सास्तुरच्या सरपंच सौ. शितालताई पाटील यांच्या उपस्थितीत सिमेंट रस्त्याचे लोकार्पण व माहेर घर इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सास्तुरच्या सरपंच सौ. शीतलताई पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे, ग्रामीण रुग्णालय किल्लारीच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सौ. सुजाता गलांडे मँडम, प्रकल्प अधिकारी ग्रामीण रुग्णालय स्पर्श सास्तूर जोशी आर.बी., शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पणुरे, शिवसेना लोहारा तालुकाप्रमुख जगननाथ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे, सूत्रसंचालन, प्रास्ताविक,आभार प्रदर्शन ग्रामीण रुग्णालय स्पर्श सास्तुरचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी यांनी केले. कार्यक्रमाला स्पर्शचा सर्व डॉक्टर, कर्मचारी, सास्तुर व परिसरातील गावचे सरपंच व नागरिक उपस्थित होते.