धाराशिव (प्रतिनिधी)- शासनाच्या माध्यमातून गरीब व गरजू लाभार्थ्यांना पिवळे रेशन कार्ड वितरित करण्यात आलेली आहेत. या कार्डवर अनेक जण फक्त रेशनवर देण्यात येणारे धान्य उचलतात. मात्र या कार्डच्या माध्यमातून विविध आजारावर मोफत उपचार करण्याच्या सुविधा आहेत. त्यामुळे त्या आरोग्य सुविधांसह इतर सर्व शासकीय सुविधांचा लाभ घ्यावा सर्वच लाभार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांनी आज येथे केले.

राज्य आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांचा दि.26,27  व 28 जून असा तीन दिवसीय धाराशिव जिल्हा दौरा नियोजित आहे. या दरम्यान स्वस्त धान्य दुकानामार्फत वितरित करण्यात येणार्‍या अन्नधान्य योजनेत काही त्रुटी आहेत का ? किंवा लाभार्थ्यांना तो माल मिळतो अथवा नाही ? यासाठी तीन दिवसीय पाहणी दौर्‍याचे आयोजन करण्यात आले आहे. पाहणी नंतर अतिरिक्त जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे व जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे यांच्या समवेत अध्यक्ष श्री. ढवळे व सदस्यांनी बैठक घेऊन बेघर व विधवा महिलांना रेशन कार्डाचे वाटप करण्याच्या त्यांनी सूचना केल्या. याअनुषंगाने धाराशिवचे तहसिलदार डॉ. शिवानंद बिडवे यांनी तालुक्यातील बेघर व विधवा महिला यांना पिवळे- 7 व केशरी- 18 दुय्यम रेशन कार्डाचे वितरण तहसिलदार यांच्या कक्षामध्ये केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्य अन्न आयोगाचे सदस्य संपत झळके, मुंबई येथील पुरवठा निरीक्षक अधिकारी रत्नदीप सावंत, जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे, तहसिलदार डॉ शिवानंद बिडवे, नायब तहसिलदार राजाराम केलुरकर, बाजीराव तौर आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना ढवळे म्हणाले की, ऊसतोड व वीट भट्टी कामगारांना ते काम करीत असलेल्या ठिकाणी व उर्वरित त्यांचे नातेवाईक ज्या गावी राहतात त्यांना देखील रेशन धान्य मिळाले पाहिजे यासाठी जिल्हा स्तरावर योग्य नियोजन करावे अशा सूचना केल्या. विशेष म्हणजे घरपोच धान्य योजना सुरू करता येते का ? याची प्रायोगिक तत्त्वावर जिल्ह्यात चाचणी करावी असे सांगत अन्नधान्य वितरणामध्ये सुलभता व सुसूत्रता आणण्यासाठी पुरवठा विभागाने स्वस्त धान्य दुकानदारांशी सातत्याने समन्वय ठेवावा असे नमूद केले. तसेच ज्यांचे नातेवाईक संभाळ करीत नाहीत अशा एकल लाभार्थ्यांना या योजनेच्या माध्यमातून अन्नधान्य मिळावे यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविक तहसिलदार डॉ. शिवानंद बिडवे यांनी तर आभार नायब तहसिलदार राजाराम केलुरकर यांनी मानले.

 
Top