नळदुर्ग (प्रतिनिधी)-जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून वागदरीच्या गावकर्‍यांनी वृक्ष लागवड व संगोपनाच्या उपक्रमाची सुरुवात दिवाळी सणासारखी साजरी करून केली.

सहा महिन्यापूर्वीच ग्रामपंचायत मध्ये नव्याने निवडून आलेल्या लोकनियुक्त सरपंच व सदस्यांनी वागदरी गाव सुजलाम-सुफलाम करण्यासाठी अनेक विकास कामांची सुरुवात केली आहे,तर काही कामांचे लोकार्पण ही झाले आहे.जिल्ह्यात पोलीस अधिक्षक  अतुल कुलकर्णी हे कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच पर्यावरण, कृषी, पारधी बांधव जागृतीचे मोठे काम करत आहेत. जिल्ह्यात त्यांनी दहा लाख वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.या चळवळीत वागदरी ग्रामस्थ ही 5 हजार वृक्ष लावून सहभाग नोंदवत आहेत. यासाठी फळझाडे व वड, पिंपळ उंबर, चिंच, करंज, शिसव अशा देशी वृक्षांची लागवड होत आहे. यासाठी  कुलकर्णी यांनी 1 हजार झाडे पाठवून दिले आहेत.

राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाचे उमाकांत मिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हलग्यांच्या कडकडाटात, फटाक्यांच्या आतिषबाजीत,वृक्षांना औक्षण करून,हार घालून,रांगोळी काढून प्रातिनिधिक स्वरूपात या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. वृक्ष लागवडीचा हा उपक्रम सुरुवात करत असतानाच योगायोगाने वरूणराजानेही जोरदार हजेरी लावली. याचवेळी पावसात ओले चिंब होऊन गावकर्‍यांनी आनंद व्यक्त केला व सर्व वृक्षांचे उत्तम संगोपन करण्याचाही संकल्प केला.


 
Top