तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर शहरासह परिसरात आषाढी एकादशी सोहळा गुरुवार दि. 29 जून रोजी भक्तीमय वातावरणात पार पडला. आषाढी एकादशी दिनी श्री तुळजाभवानी मातेच्या कपाळी श्री. विठुरायाचा कपाळी असतो तसा गंध टिळा काढला होता. गळ्यात तुळशीच्या माळेचा हार घालण्यात आला होता. आषाढी एकादशीनिमित्ताने श्री तुळजाभवानी मंदिरातील श्री.विठ्ठल-रुकमीनी माता मंदिरात व आर्य चौक येथील मंदिरात सकाळी भाविकांनी दर्शनार्थ गर्दी केली होती. आषाढी एकादशी पुर्वसंध्येला कॉंग्रेसचे नेते दिग्विजयसिंह, राकॉंचे जेष्ट नेते एकनाथ खडसे, माजी आरोग्यमंञी राजेश टोपे, मुख्यमंञी एकनाथ शिंदेचे पुञ खा. श्रीकांत शिंदे यांनी आषाढी एकादशी निमित्त देवीचे घेतले.
तुळजापूर येथील मुक्तांगण इंग्लिश स्कुल व पिंपळा ब्रु येथील मुलांना महाराष्ट्रातील संतांची शिकवण माहित व्हावी व सांस्कृतीक परंपरेची अनुभूती देण्यासाठी शालेय दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी
विद्यार्थ्यांनी विठ्ठल -रुक्मिणी व विविध संतांच्या वेशभूषा करून दिंडीत सहभाग घेतला. इतर विद्यार्थीही वारकरी वेशभूषेत आले होते. कपाळी गंध, डोक्यावर टोपी, पांढरा पोशाख, गळ्यात टाळ व मुखी हरिनामाचा गजर करत सर्वजण आनंदाने यात सामील झाले. गावातील प्रदक्षिणा मार्गावर घरासमोर सुवासिनीनी विठ्ठल रुक्मिणीचे पूजन करून पालखीचे दर्शन घेतले. यात अंगणवाडीतील बालके व शिक्षकाही सहभागी झाल्या होत्या. मुलींनी इरकल साड्या नेसून हातात पताका, डोक्यावर तुळस घेऊन उपस्थितांचे लक्ष वेधले.