धाराशिव (प्रतिनिधी)-पदोन्नती देताना सेवाजेष्ठता हा एकमेव निकष लावावा यासाठी मागील अनेक वर्षापासून महाराष्ट्र राज्य एकल शिक्षक सेवा मंच आग्रही आहे व त्यांनी पाठपुरावा केल्यामुळे सर्व सेवा ज्येष्ठ शिक्षकांना याचा लाभ मिळाल्याने सर्व शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.  

पदोन्नतीचा विषय अनेक वर्षांचा प्रलंबित असलेला प्रश्न निकाली निघाला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य एकल शिक्षक सेवा मंचाचे प्रदेश सचिव पवन सूर्यवंशी यांनी दिली. 

धाराशिव जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेल्या 199 शिक्षकांना पदोन्नती व दर्जा वाढ व विज्ञान/ गणित प्राथमिक पदवीधर या दर्जा वाढीचा लाभ मिळाला. यासाठी महाराष्ट्र राज्य एकल प्राथमिक शिक्षक सेवा मंचच्या वतीने अनेक दिवसांपासून पाठपुरावा चालू होता. जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकांची 22 पदे प्राथमिक पदवीधर दर्जावाढ, भाषा विषयाचे 99 पदे, सामाजिक शास्त्राचे 54, तसेच विज्ञान/ गणित विषयाचे 24 अशी एकूण 199 पदे समुपदेशन घेऊन भरले आहेत.

यासाठी महाराष्ट्र राज्य एकल शिक्षक सेवा मंचाच्या शिष्टमंडळाने वारंवार जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, शिक्षण अधिकारी  सुधा साळुंखे मॅडम यांची वारंवार भेट घेऊन मागणी केली होती. 

या संदर्भातच धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास  पाटील यांच्याशी वारंवार भेटी घेऊन संबंधित विषयाचे महत्त्व पटवून सांगितले होते. पदोन्नती प्रक्रिया राबवल्या बद्दल व सेवाज्येष्ठता हा निकष लावल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांचा एकल शिक्षक सेवा मंचचे वतीने सत्कार करून आभार व्यक्त करण्यात आले.

 
Top