धाराशिव (प्रतिनिधी)-कमी खर्चासह उच्च दर्जाचे शिक्षण हे केंद्रीय विद्यापीठांचे ब्रीदवाक्य आहे. आकांक्षित जिल्हा असलेल्या धारशिवच्या शैक्षणिक गुणवत्तेला केंद्रीय विद्यापीठामुळे बळकटी मिळेल. राज्यातील दुसरे केंद्रीय विद्यापीठ धाराशिव येथे स्थापन करावे. त्यासाठी राज्यसरकारने केंद्रीय शिक्षणमंत्री ना. धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे आग्रही शिफारस करावी अशी मागणी आमदार रणाजगजितसिंह पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

देशात एकूण 55 केंद्रीय विद्यापीठ आहेत. त्यापैकी महाराष्ट्र राज्यात वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ या एकमेव केंद्रीय विद्यापीठाचा समावेश आहेत. अगदी त्याच धर्तीवर राज्यातील दुसरे केंद्रीय विद्यापीठ धाराशिव येथे स्थापन करावे अशी मागणी आमदार रणाजगजितसिंह पाटील यांनी लावून धरली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील आकांक्षीत जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला आहे. जिल्ह्याच्या शैक्षणिक गुणवत्तेला बळकटी देणे हा त्याचाच एक भाग आहे. त्याकरिता धाराशिव येथे केंद्रीय विद्यापीठ स्थापन करणे यासाठी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आग्रही शिफारस करावी विनंती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केली आहे. तसा रीतसर प्रस्ताव राज्य शासनाकडे  पाठविण्याच्या सूचनाही आमदार पाटील यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिल्या आहेत. 
Top