धाराशिव (प्रतिनिधी)-जिल्ह्यात उद्योग व पर्यटन क्षेत्रात आगामी काळात मोठी वाढ अपेक्षित असून त्यादृष्टीने आवश्यक दळणवळण व पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करण्याच्या अनुषंगाने धाराशिव विमानतळाच्या हवाई धावपट्टीचे विस्तारीकरण करणे, कौडगांव एमआयडीसीत वाढीव भुसंपादन, रस्त्यांची कामे व इतर सोयी - सुविधा उपलब्ध करुन देण्यासह इतर प्रलंबित कामांना गती देण्याच्या अनुषंगाने आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दि. 22 जून रोजी एमआयडीच्या अधिकार्यां समवेत बैठक घेऊन सूचना दिल्या.
धाराशिव येथील हवाई धावपट्टीची सध्याची लांबी 1600 मिटर असुन येथे मोठी विमाने उतरु शकत नाहीत. कौडगांव औद्योगीक वसाहती मधील प्रस्तावीत टेक्नीकल टेक्स्टाईल पार्क व इतर अपेक्षित उद्योग तसेच महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी देशभरातुन येणा-या भाविकांच्या दृष्टीने येथील हवाई धावपट्टीची लांबी वाढवण्याची आवश्यकता आहे. ही लांबी 2200 मीटर करण्याकरिता धावपट्टीच्या दोन्ही बाजूला भुसंपादन होवू शकते किंवा कसे या बाबींची शक्यता पडताळून भुसंपादनाची प्रक्रीया सुरु करण्याच्या सुचना आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी महाराष्ट्र औद्योगीक विकास महामंडळाच्या कार्यकारी अभियंता यांना दिल्या. तसेच नागपूरच्या धर्तीवर चार जिल्हयासाठी मेंटनन्स, रिपेअर्स अँड ऑईलिंग सेंटर उभारणे बाबत देखील बैठकीत चर्चा झाली.
उद्योगासाठी भासणार्या वाढत्या जमिनीची गरज लक्षात घेऊन या ठिकाणी आणखीन भूसंपादन शक्य आहे का याबाबत पडताळणी करण्याच्या सूचना अधिकार्यांना दिल्या. कौडगांव टप्पा क्र. 1 मधील 2.5 कि.मी. पैकी 2 कि. मी. रस्त्याचे काम पूर्ण झाले असून उर्वरित दोन ठिकाणचे प्रलंबीत 500 मी. भूसंपादन पुर्ण करुन रस्त्यांचे काम त्वरीत पुर्ण करणे, टप्पा क्र. 1 व 3 मधील प्रकल्पग्रस्तांसाठी राखीव भूखंडाचा आराखडा एकत्रित करणे, कौडगाव एमआयडीसी करिता राखीव ठेवलेले उजनी उद्भव योजनेचे पाणी नगर परिषद धाराशिव कडून जलद गतीने सुरू करून घेण्यासाठी प्रयत्न करणे, रेल्वे स्टेशन ते कौडगाव औद्योगीक क्षेत्र रेल्वे मार्गासाठी (रेल्वे सायडिंग) सर्व्हे करणे याबाबत सविस्तर चर्चा झाली. या अनुषंगाने महामंडळाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी व उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी दुरध्वणीद्वारे चर्चा करुन सर्व संबंधितांना अनुषंगिक कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत. तसेच जुलै महिन्यामध्ये उद्योग मंत्री ना. उदय सामंत यांच्या सोबत आढावा बैठक घेण्याचे देखील ठरले आहे.
सदरील बैठकीस महाराष्ट्र औद्योगीक विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता रमेश गुंड, उप अभियंता धनंजय कुलकर्णी, कनिष्ठ अभियंता मधुर पंडीत, सौरभ धर्माधिकारी व भुमापक बालाजी निलेवार उपस्थित होते.